Palghar School CCTV pudhari photo
पालघर

Palghar School CCTV : पालघरातील हजारो शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

जि.प.च्या १ हजार ४९३ शाळा सीसीटीव्हीविना; निधीअभावी सुरक्षा यंत्रणा रखडली

पुढारी वृत्तसेवा

पालघर : बदलापूरमधील एका खाजगी शाळेत चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीत पालघर मध्ये निधीचा अभाव असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार १०८ शाळांपैकी १ हजार ४९३ शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आतापर्यंत ६१५ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी CSR मार्फत निधी मिळवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा नियोजन,खनीकर्म निधी आणि सेस फंडातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण आवश्यक असताना पालघर जिल्ह्यात सीसीटीव्हीची अंमलबजावणी संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षात केवळ ३१ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित शाळांमध्ये कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, डहाणू तालुक्यात ४५५ शाळांपैकी २००, जव्हारमध्ये २२६ पैकी ३५, मोखाड्यात १५४ पैकी ४७, पालघरमध्ये ४०२ पैकी १३९, तलासरीमध्ये १५३ पैकी ४५, वसईमध्ये १९० पैकी ६५, विक्रमगडमध्ये २३५ पैकी ७०, तर वाडा तालुक्यातील २९३ शाळांपैकी ११४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची नोंद आहे. निधीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे बसवता न आलेल्या शाळांसाठी आता लोकसहभाग आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा आधार घेण्याच्या सूचना तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय जिल्हा नियोजन समिती, गौण खनिज निधी आणि सेस फंडातूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयासाठी शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसणे चिंतेची बाब आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी निधीची प्रतीक्षा करावी लागत असेल, तर या आदेशांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

हजारो शाळा सीसीटीव्हीविना!

एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सीसीटीव्ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी शिक्षण विभाग आणि शासन आणखी किती काळ प्रतीक्षा करणार, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या शाळांमध्ये लोकसहभाग आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा आधार घेण्याच्या सूचना तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समिती, गौण खनिज निधी आणि सेस फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.टप्याटप्याने सीसीटीव्ही बसवले जातील.
सोनाली मातेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी, पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT