पालघर: कौटुंबिक कलहातून आईने स्वतः सह दीड वर्षाच्या चिमुकलीला उंदीर मारण्याचे औषध पाजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारा दरम्यान आईचा मृत्यू झाला तर चिमुकलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर केंद्र शासित प्रदेश सिल्वासा येथील नमो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघर तालुक्यातील वसरे येथील देऊळ पाड्यात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पालघर तालुक्यातील वसरे गावातील देऊळ पाडा येथील लक्ष्मी शेलार या महिलेचे रविवारी रात्री त्यांच्या पती सोबत भांडण झाले होते. वाद विकोपाला गेल्याने महिलेने साडे दहा वाजण्याच्या सुमारास पती घरात असताना स्वत आणि दीड वर्षाच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध पाजले.
विषारी औषध पिल्याने दोघींची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी दोघींना तातडीने उपचारासाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर दोघींना पुढील उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
चिमुकलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सिल्वासा येथील नमो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तक्रार शून्य क्रमांकाने पालघर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.