पालघर : गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामात भात बियाण्याच्या दरात वाढ होत आहे.यंदाच्या हंगामात झालेल्या दहा ते पंधरा टक्के दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. भाताच्या बियाण्याच्या दहा किलो वजनाच्या पिशवीच्या किंमतीत शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली आहे.बियाण्याच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
एकीकडे आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीच्या दरात वाढ होत नाही, यंदा भात खरेदीवर सरकार कडून शेतकऱ्यांना बोनसही देण्यात आला नाही.उत्पादीत भाताच्या विक्रीचे दर वाढत नाहीत तसेच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसे उत्त्पन्न येत नाही. भात बियाण्याच्या दरवाढीमुळे भात लागवड खर्चात वाढ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना भात शेती तापदायक ठरणार आहे.
प्रमुख भात बियाण्यांचे दर गगनाला भीडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी बियाण्याच्या खरेदी मागे शंभर ते दीडशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.लागवड खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे.
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख चार हजार 962 हेक्टर क्षेत्रात भात,नागली,वरई, तूर,उडीद भुईमूग आदी पिकांची लागवड केली जाते.जिल्ह्यातील प्रमुख पीक भात असल्याने सर्वाधिक सात हजार 664 हेक्टर क्षेत्रात भाताची पेरणी केली जाते.तर जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील डोंगर उतारावर नागली आणि वरईची पेरणी करण्यात येते.
भाताच्या सर्वच बियाण्यांच्या दरात वाढ
पीक पॅटर्न नुसार पालघर जिल्ह्याची भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण एक लाख चार हजार 962 हेक्टर पैकी 76 हजार 644 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाते.एकूण लागवडीच्या 73 टक्के क्षेत्रात भात शेती केली जात असल्यामुळे दरवर्षी पंधरा ते सोळा हजार क्विंटल बियाण्याची मागणी असते.भात बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाणे पिशवीमागे एक हजार ते पंधराशे रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे.
बियाण्यांचे दर वाढल्यामुळे लागवडीच्या खर्चात वाढ झाली आहे. उत्पादीत भात विक्रीचे दर वाढत नाहीत,मागच्या खरीप हंगामात पिकवलेले भाताची विक्री केल्यानंतर सरकार कडून बोनस देण्यात आला नाही.भात विक्रीचा दरापेक्षा लागवड खर्च अधिक असल्यामुळे भातशेती परवडत नाही.बाबुराव सातवी, शेतकरी,कुडे.