

वाडा: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानित भात पिकांच्या बियाण्यांचे शुक्रवारी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद शाळा परिसरात नोंदणीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाले. वैतागलेल्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे न घेताच परतण्याची वेळ आली तर अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाळा तोंडावर आल्याने वाड्यातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. तालुक्यात जवळ्पास 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जात असून यासाठी अंदाजे 4 हजार क्विंटल बियाणांची गरज तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.
पावसाळा दारात उभा असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून शेतीची अवजारे व बी- बियाणे जमा करण्याबाबत तो व्यस्त आहे. वाढलेल्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून दरवर्षी बियाण्यांचे वाटप केले जात असून शुक्रवारी बियाणे वाटपाच्या ठिकाणी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.
वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 600 क्विंटल बियाणांची मागणी केली जाते मात्र यावर्षी सध्या केवळ 194.30 क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यात केवळ कर्जत 3 या बियाण्याचा समावेश असून रत्नागिरी 8 हे बियाणे फक्त 2.8 क्विंटल उपलब्ध झाले आहे.
जिल्हा स्तरावरून येणाऱ्या पुरवठ्यानुसार पंचायत समिती विभागाकडून ही वाटप केली जाते असे अधिकारी बाळाराम दौडा यांनी सांगितले.बियाणांची मागणी व पुरवठा यात मात्र मोठी तफावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आल्याचा आरोप अनेकांनी केला असून खाजगी दुकानात संकरीत बियाण्यांसाठी मोठी लूट होत असल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
शासनाकडून केवळ दोनच जातीचे भात उपलब्ध
कर्जत 3 या जातीच्या 10 किलो भातासाठी 300 तर 25 किलो गोणीसाठी 675 रुपये आकारले जातात. याशिवाय रत्नागिरी 8 या जातीच्या 10 किलो भातासाठी 325 रुपये निश्चित करण्यात आले आहे. कृषी सेवा केंद्रांवर याच बियाण्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत.
शासना कडून केवळ दोनच जातीचे भात उपलब्ध आहे मात्र अनेक शेतकऱ्यांना जया, सुवर्णा यासह अन्य लहान बियाण्यांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजून ते बाहेर विकत घ्यावे लागतात अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.