तलासरी :मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून तलासरी येथील उघडी गटारे अपघाताला निमंत्रण देत आहेत. एनएचएआय प्रशासनाला कधी येणार जाग? असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात महामार्गालगतची आणि सर्व्हिस रस्त्यांवरील गटारे उघडी पडली असून, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण' (एनएचएआय) अजूनही सुस्त असल्याचे चित्र आहे. तलासरी येथील उड्डाण पुलाच्या पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूला सर्विस रोडवर उघड्या गटारांमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तलासरी पुलाच्या बाजूला आणि सर्व्हिस रस्त्यांवर अनेक ठिकाणी गटारांवर सिमेंटची झाकणे बसवलेली नाहीत. पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्ता संपून उघडे गटार कुठे सुरू होते, याचा अंदाज वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना येत नाही. अशा धोकादायक ठिकाणी एनएचएआयने कोणतेही इशारा फलक किंवा बॅरिकेड्स लावलेले नाहीत. रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात एखादा पादचारी किंवा दुचाकीस्वार यात पडून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आणि सर्विस रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि 'व्हाईट टॉपिंग'च्या (काँक्रिटीकरण) कामासाठी 620 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच दमदार पावसात या कामाचा दर्जा उघडा पडला आहे. महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. नुकतेच मेंढवण आणि तलासरी परिसरादरम्यान खड्ड्यांमुळे 15 पेक्षा जास्त वाहनांचे टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
डागडुजी न केल्यास आंदोलनाचा इशारा
महामार्गावर टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या एनएचएआयला प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काहीही सोयरसुतक नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. "आम्ही नियमितपणे टोल भरतो, मग प्रशासन लोकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल स्थानिक प्रवाशांनी केला आहे. एनएचएआयने तात्काळ तलासरी परिसरातील सर्व उघडी गटारे बंद करावीत आणि खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा दिला आहे.