

वणी : पुढारी वृत्तसेवा
मुळाणे रस्त्यावरील केआरटी हायस्कूललगत असलेला पुणेगाव धरणाचा डावा कालव्यावरील पूल सध्या नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कालव्याची संरक्षक भिंत पडझड झालेल्या अवस्थेत असल्यामुळे हा परिसर धोकादायक झालेला आहे.
केआरटी हायस्कूलच्या पटांगणालगत जाणाऱ्या या कालव्याची खोली ३० ते ४० फुटांहून अधिक असून, तळ खडकाळ आहे. या रस्त्यावरील पुलावरील कठडे एक फुटाहूनही कमी उंचीचे आहेत. रस्ता सरळ असताना, पूल तिरपा असल्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकतो. पुलावरील रस्ता खराब अवस्थेत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याच निष्काळजीपणाचा फटका शुक्रवारी (दि. २६) दुचाकीस्वाराला बसला. रात्री पुलाचा अंदाज आला नसल्यामुळे तो थेट खाली कोसळून गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या परिसरात केआरटी हायस्कूल तसेच संताजी इंग्लिश मीडियम स्कूल असून, शेकडो विद्यार्थी, पालक आणि स्कूल बसेस दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. जलसंपदा विभागाचे अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थ, संस्थाचालक आणि नागरिकांनी वारंवार अर्ज देऊनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य हे देखील इतका गंभीर प्रश्न डोळ्यासमोर असतानाही हे सर्व जण मूग गिळून गप्प का आहेत, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहेत. कालव्यालगत मजबूत संरक्षक भिंत उभारावी, पुलावरील कठडे तत्काळ उंच व सुरक्षित करावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
अनेक गावांची वाहतूक येथूनच
पुलापासून ५० मीटर अंतरावर हा कालवा भूमिगत केलेला असून, त्याची खोली १०० फुटांहूनही अधिक असल्याचे सांगितले जाते. या परिसरात शाळा, रो-हाउसेस आणि मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुळाणे, बाबापूर, भातोडा, धरमबर्डा, दूधखेड या गावांची वाहतूक तसेच शेतीमालाची ने-आण याच मार्गाने होत असल्यामुळे हा रस्ता दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे.