नालासोपारा : ऑनलाईन डेटिंग ॲपवर मैत्री करून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या दोघा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे डेटिंग ॲपवर ‘हॅपन’मार्फत मैत्री करून तरुणांना लुटण्याची शक्कल या महिला लढवत होत्या.
एका 31 वर्षीय तरुणाची एका मुलीसोबत ऑनलाईन ओळख झाली. दोघे 22 नोव्हेंबरला रात्री मांडवीतील एका लॉजवर भेटले. पण ‘डेट’ला तिसरी मुलगीही सोबत आली. तिघे मिळून मद्यप्राशन करत असताना तरुणाला अचानक प्रचंड झोप आली आणि तो बेशुद्ध झाला.सकाळी जाग आली, तर गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची चेन मोबाईल फोन स्मार्ट वॉच अशी तब्बल 1,83,000 ची मालमत्ता गायब झाल्याचे आढळून आले.
या प्रकरणी तरुणाने संबधीत महिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. व गुन्ह्याचा तपास सुरू झाला. मात्र लुटारू महिलांनी गुन्हा केल्यानंतर डेटिंग ॲपवरील सर्व प्रोफाईल,लॉजवर फेक आयडी ,फेक नंबर तसेच कोणताही ऑनलाईन व्यवहार नाही आदी गोष्टींद्वारे स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान पोलिसांनी हार न मानता सलग तपास सुरू ठेवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा संबधीत महिलांनी दुसऱ्या तरुणाला जाळ्यात ओढत लुटले. याबाबत काशिमिरा पोलिसातही गुन्हा नोंद झाला होता.आता महिलांना शोधून काढण्याचे पोलिसांपुढे खरे आव्हान होते. मात्र कुठलाही ठोस पुरावा नसताना मांडवी पोलीस टीमने लॉजचे अंधुक सीसीटीव्ही फुटेज आजूबाजूच्या भागातील तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.
केवळ 48 तासांत मुंबईच्या मालाड परिसरातून मांडवी गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोघींना ताब्यात घेतलं. तसेच त्यांच्याकडून 4 लाख 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.