One friend dies in a road accident; another friend also ends his life
पालघर : पुढारी ऑनलाईन
पालघर जिल्ह्यातील नानिवली परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण भाग शोकमग्न झाला आहे. या घटनेत दोन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला असून स्थानिक नागरिक हादरले आहेत. या अपघाताचा संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो पाहून कोणीही थरारून जाईल.
माहितीनुसार, १५ वर्षीय वैभव लहांगे आणि त्याचा मित्र नितीन वरठा हे दोघे लग्नसमारंभातून उशिरा रात्री घरी परतत होते. दोघेही एकाच दुचाकीवर होते. दरम्यान, अचानक दुचाकीचा ताबा सुटला. वेग जास्त असल्याने चालकाला नियंत्रण ठेवता आले नाही आणि दुचाकी प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक सोलर खांबाला धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी उडून जवळील झाडावर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात वैभव लहांगेचा जागीच मृत्यू झाला, तर नितीन गंभीर जखमी झाला. दरम्यान, मित्राच्या मृत्यूची माहिती मिळताच नितीनला जबर धक्का बसला. मानसिकदृष्ट्या खचलेल्या नितीनने काही वेळातच जवळील झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले.
घटनेने परिसर हादरला
एका घटनेत दोन मित्रांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दोघेही अतिशय जिवलग मित्र होते आणि नेहमी एकत्रच असायचे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातावेळी दुचाकीचा वेग किती होता आणि इतर कोणते कारण या दुर्घटनेला कारणीभूत होते का, याचा तपास पोलिस करत आहेत.