डहाणू : डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आलेले धवललक्ष्मी नावाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादी कासव तब्बल 100 दिवसांच्या सागरी प्रवासानंतर ओमान देशाच्या सागरी हद्दीत पोहोचले आहे. उपचारानंतर सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडण्यात आलेले देशातील हे पहिले कासव असून त्याच्या सागरी प्रवासाचा अभ्यास वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कांदळवन विभागाकडून केला जात आहे.
गतवर्षी 20 नोव्हेंबर रोजी डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आलेल्या धवललक्ष्मीने 9 मार्चपर्यंत शंभर दिवसांचा प्रवास पूर्ण केला. या कालावधीत तिने गुजरात व दमण मार्गे ओमान देशाच्या सागरी हद्दीकडे प्रवास केला. ओमानमधील प्रसिद्ध मसीराह बेटाच्या परिसरापर्यंत ती पोहोचली आहे. हे बेट उत्तर हिंदी महासागरात असून लाँगरहेड प्रजातीच्या कासवांच्या घरट्यांसाठी ओळखले जाते. शंभर दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर धवललक्ष्मी ओमानच्या समुद्रकिनाऱ्या पासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात पोहोचली आहे. त्यानंतर तिने ईशान्य दिशेकडे आपला मार्ग बदलला असून समुद्रातील प्रचलित सागरी प्रवाह तसेच अन्नाच्या शोधात ती वारंवार खोल पाण्यात डुबक्या मारत असल्याचे तिच्या हालचालींच्या नोंदींवरून तज्ज्ञांनी सांगितले आहे. 26 फेब्रुवारी रोजी ती ओमानच्या समुद्रातील मसीराह बेटापासून सुमारे 160 किलोमीटर पूर्वेस असल्याची नोंद करण्यात आली होती.
डहाणू उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात देशातील पहिले सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्र कार्यरत आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या या कासवावर येथे सुमारे तीन महिने उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला धवललक्ष्मी असे नाव देण्यात आले आणि त्याच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवून 20 नोव्हेंबर 2025 रोजी डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आले. सॅटेलाइट टॅगच्या मदतीने त्याच्या सागरी हालचालींची नियमित नोंद घेतली जात आहे. 20 ते 25 नोव्हेंबर या पाच दिवसांत धवललक्ष्मीने सोडलेल्या ठिकाणापासून सुमारे 45 किलोमीटर अंतर पार केले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ती दमण व गुजरातमधील सोमनाथ परिसरातील समुद्रात आढळली. 5 जानेवारी रोजी पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात तिची नोंद झाली होती.
नवीन वर्षात ओमानच्या सागरी हद्दीकडे प्रवास करताना 20 जानेवारी रोजी ती किनाऱ्यापासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर असल्याचे दिसून आले. 5 फेब्रुवारी रोजी किनाऱ्यापासून 500 किलोमीटर अंतरावर असताना ती पाण्यात तब्बल 250 मीटर पर्यंत खोल डुबक्या मारताना आढळली. 11 फेब्रुवारीच्या नोंदीनुसार मागील आठ दिवसांत तिने सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास केला होता.
उपचारानंतर सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडण्यात आलेले देशातील हे पहिले कासव असल्यामुळे धवललक्ष्मीच्या सागरी जलविहाराचा अभ्यास संशोधकांकडून विशेष लक्ष देऊन केला जात आहे. तिच्या हालचालींमधून ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्थलांतर, सागरी प्रवाह आणि अन्नसाखळी याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.