साहेबांच्या दिमतीला नवीन कार गरिबांच्या रुग्णवाहिका झाल्या भंगार pudhari photo
पालघर

Palghar News : साहेबांच्या दिमतीला नवीन कार गरिबांच्या रुग्णवाहिका झाल्या भंगार

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा; शासनाचा प्राधान्यक्रम चुकतोय का?

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झालेले असताना अनेक रुग्णवाहिका आज भंगार अवस्थेत असून कुठेही कधीही बंद पडू शकतात. अशा रुग्णवाहिका सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून येतात. एवढेच काय तर भर रस्त्यात अशा बंद पडलेल्या रुग्णवाहिका दिसून येतात. तर काही रुग्णवाहिका गॅरेजमध्ये महिनो महिने उभे असल्याचे देखील दिसून येत आहेत. असे असताना नुकतेच पालघर जिल्ह्यातील खाते प्रमुख आणि कार्यरत पदाधिकारी यांच्यासाठी नवीन करकरीत 12 वाहने घेतली असून पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे नुकतेच उद्घाटन झाले. यामुळे साहेबांच्या दिमतीला नवीन कार आणि रुग्णांना भंगार रुग्णवाहिकेचा आधार असंच काहीस चित्र पालघर जिल्ह्यात दिसून येत आहे.

शासनाचा आणि प्रशासनाचा प्राधान्यक्रम चुकतोय काय असाच सवाल आता यातून उभा रहात आहे. प्रशासनाचा गाडा चालण्यासाठी नवीन वाहने असणे किंवा ती विकत घेणे याच्यात गैर काहीच नाही, मात्र दुसरीकडे रुग्णवाहिका भंगार झालेल्या असताना त्यांच्या नवीन खरेदीसाठी असा गतिशील कारभार का नाही हा सवाल आहे.

मुळात अगोदरच रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यात अनेक रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. अशा परिस्थितीत केवळ पदाधिकारी आणि खाते प्रमुख यांच्यासाठी नवीन वाहने खरेदी होत असताना नवीन रुग्णवाहिका का खरेदी होत नाहीत? असाही सवाल भोळ्या भाबड्य जनतेला पडलेला आहे.

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणारे प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या 46 इतकी आहे. उपकेंद्र 314 आरोग्य पथक 18 भरारी पथके 49 आपला दवाखाना सात आणि आयुर्वेदिक दवाखाने नऊ याशिवाय अर्बन दवाखाने 15 आहेत. यावर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अवलंबून आहे.

एवढ्या सगळ्या आरोग्य केंद्रांसाठी आज 108 सोडून फक्त 53 रुग्णवाहिका आहेत. यामुळे आज प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या पाहिली तर 46 इतकी आहे. आरोग्य पथक, भरारी पथके, उपकेंद्र अशा सगळ्यांमधून रुग्णांना स्थानांतर करण्याचे प्रमाण अधिक आहे. गरोदर माता, जीकरीच्या प्रसूती या सोडून अपघातग्रस्त रुग्णांची संख्या सुद्धा अधिक असल्याने त्यांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय किंवा पालघर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात येते.

अशावेळी जर आरोग्य केंद्रांची संख्या आणि रुग्णवाहिकेची संख्या पाहिल्यास याचा ताळमेळ कुठे जमत नाही. एका प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात किमान चारहून अधिक उपकेंद्र असतात अशावेळी एका रुग्णाला जर घेऊन रुग्णवाहिका गेली त्याचवेळी त्या चार उपकेंद्रातील भागातील इतर रुग्णाला मात्र तालुक्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पुढील उपचारासाठी त्या रुग्णाची मोठ्या प्रमाणावर आबळ ही दररोज होत असते.

दुसरीकडे कागदावर जरी हा रुग्णवाहिकेचा आकडा 53 असला तरी यातील अनेक रुग्णवाहिका आज नादुरुस्त असून उभे आहेत तर काही रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. अशी विदारक स्थिती असताना दुसरीकडे खातेप्रमुखांसाठी नवीन वाहने घेऊन जिल्ह्यातील कोणत्या विकासाच्या गप्पा आपण मारत आहोत हे शासनाने एकदा पालघर वासियांना सांगणे गरजेचे बनले आहे.

मृत्यूंचे दृष्टचक्र सुरूच....

अगदी काल परवाच जव्हार तालुक्यातील एका अडीच वर्षीय बालिकेचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना घडली तर याआधी मोखाडा तालुक्यातील राजेवाडी येथील एका बालकाच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिका आणि सव्वाहीका न मिळाल्याने प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मृतदेह बस ने प्रवास करत आणण्याची घटना ताजी आहे. रुग्णवाहिक अभावी तर कधी डॉक्टरांना भावी तर कधी योग्य उपचार न झाल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही अनेक माता बालके आपला जीव गमावत आहेत तर प्रसूती दरम्यान काही अर्भकांना हे जग बघण्याआधीच जीव सोडावा लागत आहे.

यामुळे अशावेळी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करणे वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरणे तज्ञ डॉक्टरांची निकड पुरवणे याशिवाय ऑपरेशन थेटर मध्ये सुसज्जता आणणे भूलतज्ञांची अधिक नियुक्ती करणे हा शासनाचा प्राधान्यक्रम असायला हवा मात्र दुर्दैवाने याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे असेच एकूण चित्र जिल्ह्यात निर्माण झालेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT