डहाणू (पालघर) : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, जोपर्यंत अजित दादा पवार आहेत, तोपर्यंत लाडकी बहिण योजना सुरूच राहील. अजित दादा दिलेला शब्द पाळतात आणि सर्वसामान्यांसाठी काम करणं हेच त्यांचं ब्रीद आहे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरहरी झिरवाळ यांनी केले. ते डहाणू येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नसतानाही पक्ष कमजोर झालेला नाही, उलट वाढत्या जनसमर्थनामुळे पक्षाची पायाभरणी अधिक मजबूत होत आहे. सर्वच समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, हा अजित पवार यांचा दृष्टिकोन आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी पालघर, डहाणू, जव्हार आणि वाडा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले असल्याचे सांगत, मित्रपक्षांनी आमच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा दिला. कार्यकर्ता मेळाव्यात वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी पक्षाला स्थानिक स्तरावर योग्य वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मित्रपक्षांनी आमचा वापर करून घेतला आणि आता आमच्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप त्यांनी केला. वसई-विरार हानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी नेतृत्वासमोर केली.
ज्येष्ठ नेते संदीप वैद्य यांनी यावेळी बोलताना, आपली खरी लढाई विरोधी पक्षाशी कमी आणि काही अंशी मित्रपक्षांशी जास्त आहे, असे स्पष्टपणे सांगत स्थानिक स्तरावर स्वतंत्र संघटन मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार यांनी आमदार नसल्यामुळे शासकीय कामकाजात अडथळे येत असल्याची खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पक्षाची ताकद असतानाही आमदार नसल्यामुळे प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.
अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक या मेळाव्यात डहाणू, तलासरी, वाडा, पालघर, जव्हार, मोखाडा आदी तालुक्यांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मेळावा संपल्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी डहाणू तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नुकसानीचा तपशील जाणून घेतला आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय शासकीय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.