नालासोपारा: नालासोपारा पूर्व परिसरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने 27 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललनकुमार चौधरी 27 हे नालासोपारा पूर्व येथील हनुमान नगर, यादवपाडा, धानिवबाग तलाव परिसरात राहात होते. त्यांनी घरातच ‘रॅटकील’ नावाचे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची घटना घडली.
त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना 26 मार्च 2026 रोजी पहाटे 4.07 वाजता मुंबईतील नायर रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले.
तेथे डॉक्टरांनी त्यांना वॉर्ड क्रमांक 22 (एम.आय.सी.यू.) मध्ये उपचारासाठी ठेवले होते. मात्र उपचार सुरू असताना 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7.20 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही तसेच कोणाविरुद्ध तक्रारही दिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.