वसई : मंगळवारी मध्यरात्रीची वेळ. इमारतीच्या १४ व्या मजल्यावर लागलेल्या आगीनेे रौद्र रूप धारण केलेले. घरातून बाहेर पडणारे आगीचे लोळ आणि जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या बाहेरील एका छोट्या जागेचा आधार घेत मृत्यूशी झुंज देणारे एकाच कुटुंबातील चार जण!
पाऊण तास मदतीच्या प्रतीक्षेत जीव मुठीत धरून उभ्या या चौघांसाठी प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेतला होता. अखेर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या क्रेनच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली. दुर्दैव असे की, जिन्यामध्ये पसरलेल्या अतिविषारी धुरामुळे फाल्गुनी शाह (५० वर्षे), अश्विनी पारकर (५० वर्षे) यांचा गुदमरून मृत्यू झाला.
नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पिरियल इमारतीच्या १४ व्या मजल्यावर मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला, तर सात जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता आणि उंच मजल्यावर अडकलेले नागरिक यामुळे बचावकार्य मोठे आव्हान ठरले होते.
घरातून आगीचे लोळ बाहेर पडत असताना चौघांनी इमारतीच्या बाहेरील छोट्याशा जागेचा आधार घेतला. खाली उतरण्याचा मार्ग धोकादायक बनल्याने त्यांना मदतीची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर अग्निशमन जवानांनी मोठ्या क्रेनच्या सहाय्याने एकेकाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या दुर्घटनेत फाल्गुनी शाह (५०) आणि अश्विनी पारकर (५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला.
मोठ्या प्रमाणात पसरलेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या आगीत जखमी झालेल्या सहा जणांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वसईच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित आणि माजी महापौर रुपेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. आचोळे पोलीसही घटनास्थळी होते.
सोसायटी हस्तांतरण प्रलंबित
रहिवाशांनी आरोप केला आहे की, इमारतीचे बांधकाम २०२२ मध्येच पूर्ण झाले होते. मात्र, बिल्डरने अद्याप ही इमारत सोसायटीकडे हस्तांतरित केलेली नाही. दुर्घटनेच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वीच या हस्तांतरणासाठी रहिवाशांची बैठकही झाली होती.
अग्निशमन यंत्रणा बंद
इमारतीत फायर फायटिंग सिस्टीम (अग्निशामक यंत्रणा) बसवण्यात आली असली तरी प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी ती पूर्णपणे बंद/अकार्यान्वित होती. तसेच इमारतीमधील अग्निशामक बाटल्याही कुचकामी ठरल्या