Accident News Pudhari
पालघर

Accident News: मुंबई-बडोदा दृतगती महामार्गावरील पूलाला डम्परची धडक

चालक गंभीर जखमी,ऍनिमल पास ब्रिजचे नुकसान झाल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई बडोदा दृतगती महामार्गावरील नावझे गावाच्या हद्दीत वन्य प्राण्यांच्या हालचालीसाठी उभारलेला पूलाला डम्परने धडक दिल्याने डम्परचे मोठे नुकसान झाले तर चालक गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त डम्पर भरधाव वेगात पुलाच्या गर्डरला धडकल्याने पुलाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुलाखालून जात असलेला डम्पर पुलाला धडकला.दोन महिन्यांपूर्वी खामलोली गावाच्या हद्दीतील मुंबई बडोदा दृतगती महामार्गाच्या लोखंडी पादचारी पुलाला डम्पर धडकला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नव्याने तयार केलेल्या महामार्गाचा ठेकेदारांकडून बेकायदेशीर रित्या माती मुरूम वाहतुकीसाठी वापर केला जात आहे.महामार्ग प्राधिकरणा कडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील मुंबई बडोदा दृतगती महामार्ग निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही काही महिन्यात महामार्गावरून वाहतूक सुरु करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात असताना पुन्हा एकदा डम्पर पुलाला धडकल्याची घटना घडल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामगार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पालघर तालुक्यातील नावझे गावाच्या हद्दीत मुंबई बडोदा दृतगती महामार्गामुळे जंगल बाधित झाले आहे. याठिकाणी वन्य प्राण्यांच्या हालचालीसाठी ऍनिमल पास ब्रिज उभारण्यात आला आहे.मासवण पासून सोनावे गावापर्यंत सुमारे पंधरा किलोमीटर लांबीच्या दृतगती महामार्गाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे.

नावझे आणि धुकटन गावाच्या हद्दीत रेस्ट एरिया उभारणीसाठी सुरु मोठया प्रमाणात भराव काम सुरु आहे.मुरूम वाहतूक करणारे शेकडो ट्रक बेकायदेशीर रित्या महामार्गाचा वापर करून रेस्ट एरिया मध्ये माती मुरूमाचा भराव जात आहे. ऍनिमल पास ब्रिजचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. पूल वापरात येण्याआधीच डम्परच्या धडकेमुळे पुलाचे नुकसान झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.यात मुंबई बडोदा दृतगती महामार्गाच्या गुजरात मार्गीकेवरील लोखंडी संरचननेचे नुकसान झाले आहे.

पालघर तालुक्यातील मासवण पासून वसई तालुक्यातील कोपर फाट्यापर्यंतच्या दृतगती महामार्ग उभारण्याचा ठेका जीआर इन्फ्रा कंपनीकडे आहे.रेस्ट एरियाच्या भराव कामासाठी सुरु असलेल्या अवजड वाहतुकी दरम्यान निष्काळजीपणा मुळे अपघात होऊन पुलाचे नुकसान झाल्याचा प्रकार घडला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ठेकेदाराकडून नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर अवजड वाहतूक करून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.ओव्हरलोड वाहतूक आणि निष्काळजीपणा मुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पुलाखालून जात असलेल्या डम्परचा डम्प उचलेल्या अवस्थेत डम्पर पुढे नेल्याने ऍनिमल पासला धडक बसली, यात पुलाचे नुकसान झालेले नाही.ठेकेदार आणि डम्पर चालका विरोधात कारवाई केली जाईल, पुलाची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मासवण ते सोनावे पर्यंतचा महामार्ग वाहतूकीसाठी खुला केलेला नाही.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT