केळवा रोड : स्थलांतरित असलेले फ्लेमिंगो मुंबई, ठाण्याच्या खाडीमध्ये स्थिरावले असून आता भारतीय पक्ष्यांतच त्यांचा समावेश होऊ लागला आहे. मात्र खाडी आणि समुद्र किनाऱ्यांच्या आणि मिठागरे विकासाच्या प्रकल्पांमुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
नवी मुंबई आणि ठाणे खाडीच्या किनऱ्यावर मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो अभयारण्य उभे करण्यात आले आहे. त्याला रामसर दर्जाही देण्यात आला आहे. आता मिठागरांची जागाही फ्लेमिंगो अभयारण्यालाही द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मुंबई ठाण्याकडून पालघर जिल्ह्यातील केळवा-माहीम मिठागर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. नवी मुंबई, शिवडी, ठाणे दरम्यान पाणथळ जागांवर १५ हजारांहून अधिक फ्लेमिंगो दिसतात. आता हे पक्षी पालघर जिल्ह्यातील केळवे भागातही स्थलांतरित होत आहेत.
७० ते ८० पक्षी या भागात पहिल्यांदाच पाहायला मिळाले. फ्लेमिंगोबरोबरच करकोचा, ऑपन बिल, पांढरे आयबीस हे पक्षी देखील या भागात दिसतात. पालघर पासून १२ कि. मी. असलेले केळवे बीच आता पक्षी निरिक्षणाचे केंद्रही होत आहे. फ्लेमिंगो हे स्थलांतरित पक्षी असून त्यांना भारतातील वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.
या पक्ष्यांना त्रास देणे, घाबरवणे किंवा त्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण करणे, हा कायद्याचा भंग ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, ड्रोनचा आवाज आणि जवळून होणारे उड्डाण यामुळे फ्लेमिंगो मोठ्या थव्याने अचानक उडून जातात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनावश्यक ऊर्जा खर्च होते. अन्न शोधणे, विश्रांती घेणे, प्रजनन आणि घरट्यांची प्रक्रिया विस्कळीत होते. अंडी किंवा पिल्ले असल्यास त्यांच्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
वारंवार होणाऱ्या अशा व्यत्ययामुळे स्थलांतरित पक्षी त्या अधिवासाचा त्याग करण्याचाही धोका निर्माण होतो. पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले की, नवी मुंबई, सांभर सरोवर, कच्छ तसेच पालघरसारख्या पाणथळ भागांमध्ये ड्रोनमुळे पक्ष्यांच्या वर्तनावर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्येही स्पष्ट झाले आहे.
शेकडो फ्लेमिंगो हे ठाण्याच्या खाडी किनारी अन्नाच्या शोधात वस्ती करतात. फ्लेमिंगो अभयारण्यातील हे पक्षी खारफुटीच्या जंगलात घरटी बांधतात. फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे येथे पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. येथे फ्लेमिंगो महोत्सवही घेतला जातो. शाळा-महाविद्यालयातील मुलेही येथे पक्षी निरीक्षणासाठी येतात.
ड्रोनमुळे पक्ष्यांना भीती
वन्यजीव तज्ज्ञांनीही नागरिकांना आवाहन केले आहे की, फ्लेमिंगोंचे छायाचित्रण करताना सुरक्षित अंतर राखावे, ड्रोनचा वापर टाळावा किंवा आवश्यक असल्यास संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी. पक्षी अस्वस्थ होत असल्याचे दिसताच चित्रीकरण तत्काळ थांबवावे. व्हायरल व्हीडिओपेक्षा वन्यजीवांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश त्यांनी दिला. या देखण्या पक्ष्यांच्या दर्शनासाठी पर्यटक आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने येथे येत आहेत. मात्र, सोशल मीडियासाठी व्हीडिओ आणि छायाचित्रे टिपण्याच्या उद्देशाने काही जणांकडून अनधिकृतपणे येथे ड्रोन उडवले जात असल्याने फ्लेमिंगोंच्या नैसर्गिक अधिवासाला गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
वन विभाग आणि प्रशासनाने केळवा-माहीम मिठागर परिसरात अनधिकृत ड्रोन उड्डाणांवर तातडीने निर्बंध घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटक, छायाचित्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर कठोर कारवाई करावी.भावेश बाबरे, पर्यावरणप्रेमी आणि पक्षी अभ्यासक