

कावेरी गिरी
महाराष्ट्रात काजवे (Fireflies) प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांग, पश्चिम घाटातील दाट जंगलं आणि कमी प्रकाश प्रदूषण असलेल्या भागांमध्ये आढळतात. त्यांना उबदार, दमट आणि नैसर्गिक अधिवास अनुकूल असल्यामुळे मेअखेर ते जूनच्या मध्यापर्यंत, पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची संख्या सर्वाधिक दिसते.
पावसाळ्याची पहिली सर, ओलसर मातीचा दरवळ, गावाबाहेरची झाडी आणि अंधार पडताच लुकलुकणारे काजवे... एका पिढीच्या बालपणाच्या आठवणीत हे चित्र आजही तितकेच जिवंत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या की, शेताच्या बांधावर, अंगणात किंवा जंगलाच्या कडेला हजारो काजवे चमकत असत. आज मात्र हे दृश्य दुर्मीळ होत चालले आहे. त्यामुळे सहज प्रश्न पडतो, काजवे खरोखरच कमी झाले आहेत की हा केवळ आठवणींचा भास आहे? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे आहे. जगभरातील संशोधनातून असे स्पष्ट होत आहे की, अनेक काजवा प्रजातींची संख्या चिंताजनकरीत्या घटत आहे. अर्थात, सर्वच प्रजाती आणि सर्वच प्रदेशांमध्ये समान प्रमाणात घट झाली आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, जगात सुमारे २,६०० हून अधिक काजवा प्रजाती असल्या, तरी त्यापैकी फारच थोड्यांचा सखोल अभ्यास झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार सुमारे २० टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्याच्या छायेत आहेत.
काजवे हे केवळ निसर्गसौंदर्य वाढवणारे कीटक नाहीत. पर्यावरणाच्या आरोग्याचे ते महत्त्वाचे निर्देशक मानले जातात. त्यांच्या अळ्या ओलसर मातीत राहून गोगलगायी, कृमी आणि इतर सूक्ष्म जीवांवर उपजीविका करतात. त्यामुळे अन्नसाखळीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. एखाद्या परिसरात काजवे दिसणे म्हणजे तेथे अजूनही नैसर्गिक अंधार, ओलसर जमीन आणि तुलनेने कमी प्रदूषण टिकून असल्याचे लक्षण मानले जाते. काजव्यांचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजे त्यांचा जैवप्रकाश. शरीरातील विशिष्ट रासायनिक प्रक्रियेतून निर्माण होणारा हा प्रकाश केवळ आकर्षक नसतो. तो त्यांच्या संवादाचे माध्यम असते. नर आणि मादी एकमेकांना विशिष्ट प्रकाशसंकेत देऊन जोडीदार शोधतात. प्रत्येक प्रजातीची चमकण्याची लय वेगळी असते. त्यामुळे कृत्रिम प्रकाश वाढला की, हा संवादच विस्कळीत होतो आणि त्याचा थेट परिणाम प्रजननावर होतो.
आज काजव्यांसमोरील सर्वात मोठा धोका म्हणजे वाढते प्रकाश प्रदूषण. शहरांपुरतेच नव्हे, तर गावागावांत एलईडी दिवे, हायमास्ट, रिसॉर्टस्, फार् महाऊस आणि रात्रभर सुरू असलेली रोषणाई यामुळे नैसर्गिक अंधार झपाट्याने कमी होत आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, जोडीदार शोधण्यासाठी काजव्यांना अंधार आवश्यक असतो. कृत्रिम प्रकाशामुळे त्यांचे संकेत निष्प्रभ ठरतात आणि प्रजननाची प्रक्रिया बाधित होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अधिवासाचा ऱ्हास. जंगलतोड, दलदली आणि ओलसर जागांचे नाहीसे होणे, शेतीचे नागरीकरण, रस्ते आणि बांधकामांचा विस्तार यामुळे काजव्यांची निवासस्थाने वेगाने कमी होत आहेत. ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी हजारो काजवे दिसत असत, तेथे आज वसाहती, कारखाने किंवा व्यावसायिक संकुले उभी आहेत. अधिवास नष्ट झाला की, त्या भागातील काजव्यांचे अस्तित्वही धोक्यात येते.
कीटकनाशकांचा वाढता वापर ही आणखी एक गंभीर समस्या आहे. काजव्यांच्या अळ्या अनेक महिने जमिनीत राहतात. शेतीत आणि बागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यापक परिणाम करणाऱ्या कीटकनाशकांचा त्यांच्यावर थेट परिणाम होतो. त्याचबरोबर त्यांच्या खाद्यजीवांची संख्याही घटते. परिणामी, काजव्यांचे संपूर्ण जीवनचक्र विस्कळीत होते. हवामान बदलाचे परिणामही आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. अनियमित पाऊस, वाढते तापमान, दीर्घकाळचा दुष्काळ आणि वारंवार येणारे पूर यांमुळे अनेक प्रजातींचे अधिवास बदलत आहेत. काही किनारी भागांमध्ये समुद्रपातळी वाढल्याने नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.
भारतातही काजव्यांवरील संशोधनाला अलीकडच्या काळात वेग आला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पहिल्या सर्वसमावेशक भारतीय काजवा सूचीमध्ये देशातील ९२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक प्रजाती भारतातच आढळतात. पश्चिम घाट हा काजव्यांच्या जैवविविधतेचा सर्वाधिक समृद्ध प्रदेश असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे; मात्र प्रकाश प्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास आणि कीटकनाशकांमुळे भारतीय काजव्यांनाही वाढता धोका असल्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे. महाराष्ट्रातील भंडारदरा, राजमाची, पुरंदर परिसर, आंबोली, चांदोली, राधानगरी तसेच सह्याद्रीच्या दऱ्या आणि कोकणातील अनेक जंगलांमध्ये आजही पावसाळ्याच्या सुरुवातीला काजव्यांचे नेत्रदीपक दर्शन घडते. हजारो काजवे एकाच वेळी चमकताना पाहण्यासाठी पर्यटक विशेष सहली करतात; मात्र वाढत्या पर्यटनामुळेही नवे प्रश्न निर्माण होत आहेत. फ्लॅश फोटोग्राफी, मोठा आवाज, वाहनांची गर्दी आणि कृत्रिम प्रकाश यांमुळे त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे, तरीही आशेचा किरण कायम आहे. काही शहरांतील उद्याने, नैसर्गिक हिरवळी आणि संरक्षित जंगलांमध्ये काजवे अजूनही टिकून आहेत. योग्य अधिवास आणि नैसर्गिक अंधार उपलब्ध करून दिल्यास त्यांची संख्या पुन्हा वाढू शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे.
यासाठी सामान्य नागरिकही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अनावश्यक बाहेरील दिवे बंद ठेवणे, बागेत पानांचा नैसर्गिक थर जपणे, कीटकनाशकांचा वापर मर्यादित करणे, ओलसर जागा संरक्षित ठेवणे आणि काजवे पाहण्यासाठी गेल्यास फ्लॅशचा वापर टाळणे, या साध्या वाटणाऱ्या कृती त्यांच्या संवर्धनासाठी मोलाच्या ठरू शकतात. महाराष्ट्रात काजवे (Fireflies) प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांग, पश्चिम घाटातील दाट जंगलं आणि कमी प्रकाश प्रदूषण असलेल्या भागांमध्ये आढळतात. त्यांना उबदार, दमट आणि नैसर्गिक अधिवास अनुकूल असल्यामुळे मेअखेर ते जूनच्या मध्यापर्यंत, पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची संख्या सर्वाधिक दिसते.
काजवे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकाणे : पुरुषवाडी, साम्रद गाव, कळसुबाई परिसर, प्रबळमाची, कोथळीगड, इगतपुरी, पय घाट, सह्याद्रीतील अनेक जंगल भागांमध्ये काजवे दिसतात.
निसर्ग संवर्धनासाठी लक्षात ठेवा
फ्लॅश लावून छायाचित्रण करू नका.
मोठ्या आवाजात संगीत वाजवू नका.
काजवे पकडू किंवा त्यांचा अधिवास नष्ट करू नका.
प्लास्टिक किंवा कचरा जंगलात टाकू नका.
काजवे ही केवळ बालपणाची आठवण नाही. ते आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याचे जिवंत संकेत आहेत. त्यांच्या मंद प्रकाशात निसर्गाचा समतोल दडलेला आहे. हा प्रकाश टिकवायचा असेल, तर आजच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करावे लागेल. अन्यथा उद्याच्या पिढीला काजवे प्रत्यक्षात नव्हे, तर फक्त गोष्टींच्या पुस्तकांत, कवितांत आणि जुन्या आठवणींतच भेटतील.