Accident file photo
पालघर

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकचा विचित्र अपघात

ट्रकचा निखळलेला टायर आदळल्याने पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकचा टायर निखळून झालेल्या विचित्र अपघातात महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

पालघर तालुक्यातील वरई उड्डाणपुलालगत पेट्रोलिंग करत असताना महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे यांना निखळलेला टायर जोरदार धडकल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महामार्ग वाहतूक विभागाच्या मनोर उपकेंद्रातील पथकाकडून नेहमीप्रमाणे वरई उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या भागात मुंबई वाहिनीवर वाहनांची तपासणी आणि पेट्रोलिंगचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुजरात वाहिनीवरील उतार आणि वळणाच्या ठिकाणी एका भरधाव ट्रकचा अचानक टायर निखळला.

वेगाने निखळून आलेला हा टायर उतारामुळे गुजरात वाहिनीवरून घसरत मुंबई वाहिनीच्या दिशेने आला. याचदरम्यान मुंबई वाहिनीवरून जाणाऱ्या एका ट्रकला हा टायर धडकला आणि त्यानंतर तो महामार्गालगत पेट्रोलिंगसाठी उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने आला.

या अचानक घडलेल्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. निखळलेला टायर थेट त्यांच्या अंगावर आदळला. टायरच्या जोरदार धडकेमुळे बोराडे हे पाच ते सहा फूट लांब फेकले गेले. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव सुरू झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या महामार्ग वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करत त्यांना मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बोईसर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान,मुंबई अहमदाबाद महामार्गावर वेग मर्यादा वाढवल्यामुळे तसचे व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनांचे अपघात आणि टायर निखळण्याच्या घटना वाढल्या आहे.

दरम्यान मुंबई- अहमदाबाद महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT