पालघर ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रेलरचा अपघात झाला होता. कंटेनरवरील इलेक्ट्रिक पॅनेलमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त ट्रेलरचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक पॅनेल घेऊन मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलरच्या चालकाचे वाडा खडकोना गावाच्या हद्दीत ट्रेलरवरील नियंत्रण सुटले वट्रेलर थेट दुभाजकाला धडकून उलटला. अपघातात ट्रेलरमधील अवजड इलेक्ट्रिक पॅनेल महामार्गावर विखुरले गेले.
दरम्यान महामार्गावर पडलेल्या इलेक्ट्रिक पॅनेलमुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. क्रेनच्या साहाय्याने महामार्गावर पडलेले इलेक्ट्रिक पॅनेल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामामुळे महामार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रेलर चालक किरकोळ जखमी असून, त्याला जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.