पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ढेकाळे गावाच्या हद्दीतील खिंडीच्या उतारावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बोईसर-कोल्हापूर एसटी बस ट्रकला धडकून अपघात झाला. अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमधील 22 प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गुजरात वाहिनीवरून बोईसरच्या दिशेने जात असताना एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. उताराच्या भागात बस थेट ट्रकवर आदळल्याने मोठा आवाज झाला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
सुदैवाने अपघाताची तीव्रता कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बसचा आपत्कालीन दरवाजा उघडून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.जखमी प्रवाशांना उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघातामुळे गुजरात वाहिनीवर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. महामार्ग सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वाघोबा खिंडीतील वारंवार घडणाऱ्या अनेक अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. दरम्यान मनोर पोलीस या एसटी अपघाताच्या कारणांचा अधिक तपास करीत आहेत.