Mumbai Ahmedabad Highway pudhari photo
पालघर

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाट बिकट

वाहनचालक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला, कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामानंतरही रस्त्याची अवस्था सुधारण्याऐवजी अनेक ठिकाणी बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी हे खड्डे मोठा धोका ठरत असून, दुचाकीस्वारांसह चारचाकी व अवजड वाहनचालकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा मुंबई, पालघर, गुजरात तसेच इतर महत्त्वाच्या शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची देखभाल आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी काँक्रिटचा भाग खचला असून, त्यातून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन गेल्यास वाहनाचा तोल जाण्याची शक्यता असून, अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याचा धोका निर्माण होतो.

विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनते. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यास त्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होते. महामार्गावर वाहनचालकांकडून टोलच्या माध्यमातून शुल्क वसूल केले जात असतानाही रस्त्यांची अशी दुरवस्था का, असा सवाल नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. टोल भरूनही सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी मिळत नसल्याची भावना वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून, टायर, सस्पेन्शन तसेच वाहनांच्या इतर भागांवर त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत. त्यातच वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने खड्डे चुकविताना वाहनचालकांना अचानक लेन बदलावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताची शक्यताही वाढते.

महामार्गाचे काँक्रिटीकरण करून रस्ता अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्याचा उद्देश असताना प्रत्यक्षात काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तडे आणि खड्ड्यांमुळे या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांनी महामार्गाची तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, खड्डे बुजविण्यासह रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. टोल वसुलीच्या तुलनेत वाहनचालकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT