तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी उभाडपाडा सूत्रकार फाटा येथे पुलाचे काम सध्या सुरू असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी उभाडपाडा सूत्रकार फाटा येथे पुलाचे काम सुरू असून याठिकाणी सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई कडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी होत असल्याने मुंबई कडे जाणारे वाहने विरुद्ध दिशेने गुजरात वाहिनीवर आल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला जाणाऱ्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन मुंबई कडे जाणाऱ्या वाहिनीवर सावरोली पर्यंत महामर्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
तलासरी सूत्रकार फाटा येथे सात ते आठ महिन्यापासून पुलाचे काम सुरू असल्याने हलकी आणि अवजड वाहने नवीन केलेल्या दोन पदरी सर्विस रस्त्यावर सुरू करण्यात आले. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे.
गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहनांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर प्रवास पाच मिनिटे अंतरासाठी तासभराचा वेळ लागत आहे.
महामार्गावर टोल भरूनही वाहनचालकांना वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागते, तसेच वेळ वाया जाऊन जास्तीचे इंधनही खर्च होते. त्यामुळे जोपर्यंतमहामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करावी अशी मागणी अनेक वाहनचालक करत आहेत. महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने महामार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे.