पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील हालोली-पाडोसपाडा परिसरात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला.अपघातात मुंबईतील डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, महामार्गावरील लोखंडी सुरक्षा रेलिंग कारच्या पुढील भागातून घुसून मागील भागातून बाहेर आले.अपघातात गंभीर जखमी डॉक्टर दाम्पत्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातच्या दिशेने जाणारी कार पालघर तालुक्यातील हालोली-पाडोसपाडा भागात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव वेगातील कार महामार्गाच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडकली.अपघातात रेलिंगचा मोठा लोखंडी भाग कारच्या पुढील भागातून आरपार जात मागील बाजूने बाहेर आला.
या भीषण अपघातात कारमधील डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक,प्रवाशी आणि महामार्ग सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी हलवले.अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिला डॉक्टरला पुढील उपचारासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातातील कारची अवस्था पाहता धडकेची तीव्रता लक्षात येत असून, सुमारे १० ते १५ फूट लांबीचे लोखंडी रेलिंग कारच्या मागील भागातून बाहेर आले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.