Bullet Train  
पालघर

Mumbai-Ahmedabad bullet train cost doubles -बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढला !

Mumbai-Ahmedabad bullet train cost doubles - बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढला ! १.०८ लाख कोटींचा प्रकल्प आता २.०३ लाख कोटींवर; विरारलाही मिळणार स्थानक

पुढारी वृत्तसेवा

विरार : चेतन इंगळे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या खर्चात तब्बल दुपटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे १ लाख ८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र, आता या प्रकल्पाचा सुधारित अंदाजित खर्च २ लाख २ हजार ७९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच सुरुवातीच्या अंदाजाच्या तुलनेत प्रकल्पाचा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे.

विशेष म्हणजे, मार्च २०२६ पर्यंत या प्रकल्पावर ९२ हजार ७६१ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चवाढीबरोबरच काम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान उभारण्यात येणारा हा बुलेट ट्रेन मार्ग एकूण ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा व नगर हवेली या भागांतून हा मार्ग जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण १२ स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. यापैकी चार स्थानके महाराष्ट्रात असून मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर येथे ही स्थानके उभारली जाणार आहेत.

त्यामुळे पालघर जिल्ह्यातील विरार आणि बोईसर या दोन महत्त्वाच्या शहरांना बुलेट ट्रेनच्या माध्यमातून वेगवान रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने विरारचे स्थानक विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. बुलेट ट्रेन स्थानकामुळे विरारच्या वाहतूक व्यवस्थेत बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आधुनिक वाहतुकीच्या दिशेने महत्वाचे पाऊल

एकीकडे देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे आधुनिक वाहतुकीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे, तर दुसरीकडे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खर्चात झालेली मोठी वाढ लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः विरार आणि बोईसरसारख्या शहरांना या प्रकल्पामुळे वेगवान रेल्वे सेवेचा लाभ मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांचे लक्ष या कामाच्या प्रगतीकडे लागले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च वाढत असताना प्रकल्प वेळेत पूर्ण होणार का आणि विरारकरांना बुलेट ट्रेनचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT