विरार: देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला असून, महाराष्ट्र आणि गुजरातमधील महत्त्वाच्या बांधकामांनी निर्णायक टप्पा गाठला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी स्थानकाचे काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गुजरातमधील सुरत स्थानकाचे बांधकामही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे बीकेसी येथील स्थानक जमिनीपासून तब्बल ३० मीटर खोलीवर उभारले जात असून, हे संपूर्ण बुलेट ट्रेन मार्गावरील एकमेव भूमिगत स्थानक असणार आहे. सुरत स्थानकाच्या मुख्य संरचनेचे आणि छताचे काम पूर्ण झाले असून, आता अंतर्गत आणि अंतिम स्वरूपाची कामे वेगाने सुरू आहेत.
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गाची एकूण लांबी ५०८ किलोमीटर असून, या मार्गावर एकूण १२ स्थानके असणार आहेत. मुंबईतील बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर, त्यानंतर गुजरातमधील वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा त्यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील विरार आणि बोईसरला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. मुंबईपासून गुजरातमधील प्रमुख शहरांना अतिजलद रेल्वेने जोडण्याचा हा देशातील पहिला मोठा प्रकल्प असून, भविष्यात मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवास सुमारे दोन तासांच्या आसपास पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
बीकेसी स्थानकाचे बांधकाम या प्रकल्पातील सर्वांत आव्हानात्मक कामांपैकी एक मानले जात आहे. दाट लोकवस्ती, मोठ्या व्यावसायिक इमारती, प्रमुख रस्ते आणि मिठी नदीच्या परिसरातून भूमिगत बांधकाम करावे लागत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मार्च २०२६ पर्यंत बीकेसी स्थानकाच्या खोदकामाचे सुमारे ९१ टक्के काम पूर्ण झाले होते.
स्थानकाच्या तळाच्या स्लॅबचे काँक्रीटीकरणही पूर्ण झाले असून, आता स्थानकाच्या विविध भागांचे बांधकाम आणि इतर कामांना गती देण्यात आली आहे. जमिनीखाली सुमारे ३० मीटर खोलीवर उभारले जाणारे हे स्थानक मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भर घालणार आहे.
या प्रकल्पासाठी मुंबई विभागात एकूण २१ किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा तयार केला जात आहे. त्यापैकी सुमारे १६ किलोमीटरचा बोगदा बोगदा खोदणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने, तर उर्वरित ५ किलोमीटरचा भाग पारंपरिक नवीन ऑस्ट्रियन बोगदा पद्धतीने तयार केला जात आहे.
विक्रोळी परिसरातून बीकेसीच्या दिशेने बोगदा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे ६ किलोमीटर लांबीचा एकेरी बोगदा तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये बुलेट ट्रेनच्या दोन्ही दिशांच्या मार्गांची व्यवस्था असेल. हा बोगदा इमारती, रस्ते आणि मिठी नदीच्या खालून जाणार असल्याने या कामाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
गुजरातमधील सुरत स्थानकानेही या प्रकल्पात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. स्थानकाच्या मुख्य संरचनेचे तसेच छताचे काम पूर्ण झाले असून, आता फरशी, बाह्य आवरण, छताच्या आतील भागासह इतर अंतिम कामे सुरू आहेत. सुरत स्थानकाच्या वास्तुरचनेमध्ये शहराच्या हिऱ्याच्या उद्योगाची प्रेरणा घेण्यात आली आहे.
त्यामुळे हे स्थानक आधुनिक सुविधा देण्याबरोबरच सुरत शहराची ओळखही अधोरेखित करणार आहे. साबरमती स्थानकाला बहुविध वाहतूक केंद्र म्हणून विकसित केले जात असून, अतिजलद रेल्वेसोबत मेट्रो, बस आणि विद्यमान रेल्वे व्यवस्था जोडण्याची योजना आहे.
संपूर्ण ५०८ किलोमीटर मार्गावरील पायाभूत कामांमध्येही मोठी प्रगती झाली आहे. प्रकल्पाचा सुरुवातीचा अंदाजे खर्च सुमारे १.१० लाख कोटी रुपये होता. मात्र जमीन संपादन, वाढलेली भरपाई आणि अन्य कारणांमुळे खर्च वाढून तो सुमारे १.९८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अहवाल आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसीचे ३० मीटर खोल भूमिगत स्थानक, मुंबईतील २१ किलोमीटरचा भूमिगत बोगदा, विरार-बोईसरदरम्यानचा १.५ किलोमीटरचा डोंगरी बोगदा, सुरत स्थानकाचे पूर्ण झालेले मुख्य बांधकाम आणि मार्गावरील शेकडो किलोमीटरचे खांब व गर्डर यामुळे प्रकल्पाने आता प्रत्यक्ष आकार घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेषतः विरार आणि बोईसर या स्थानकांमुळे पालघर जिल्ह्याला मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गाशी थेट जोडणी मिळणार असल्याने या प्रकल्पाकडे वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विरार, बोईसर स्थानके महत्वाची ठरणार
महाराष्ट्रासाठी या प्रकल्पातील विरार आणि बोईसर ही दोन स्थानके विशेष महत्त्वाची ठरणार आहेत. विरार आणि बोईसरदरम्यान पालघर जिल्ह्यातील सुमारे १.५ किलोमीटर लांबीच्या डोंगरी बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा बोगदा या मार्गावरील महत्त्वाच्या तांत्रिक कामांपैकी एक आहे.
संपूर्ण प्रकल्पात सात डोंगरी बोगदे आणि एक समुद्राखालील बोगदा प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबईपासून पालघरमार्गे गुजरातपर्यंत अतिजलद रेल्वे मार्ग उभारण्यासाठी जमिनीवरील तसेच भूमिगत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे.