

मुरबाड शहर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे मुरबाड शहरातील काम पूर्ण होऊन वर्षही उलटलेले नसताना रस्त्यावर खड्डे पडल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या शहरातील सोनारपाडा परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. खड्डे भरण्यासाठी मायक्रो सँड व केमिकलचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग काँक्रीटचा असून त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत रस्त्याच्या पृष्ठभागावर दुरुस्तीची वेळ का आली? असा सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य तसेच कामाच्या तपासणीची प्रक्रिया याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता द्यावी, अशी मागणीही होत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असते. अशा परिस्थितीत अल्पावधीतच दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाल्यास ठेकेदाराच्या कामाबरोबरच त्यावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून कोणत्या अटी व हमीअंतर्गत करून घेतले जात आहे, तसेच त्यासाठी स्वतंत्र खर्च होत आहे की ठेकेदाराच्या जबाबदारीतून काम केले जात आहे? याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
अधिकृत चौकशीची आवश्यकता
महामार्गावरील अपघात आणि रस्त्याच्या स्थितीबाबत यापूर्वीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याऐवजी त्यांच्या मूळ कारणाचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात कोणतीही अनियमितता किंवा संगनमत झाले आहे, असा निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या बांधकामावर इतक्या लवकर दुरुस्तीची वेळ येणे ही बाब निश्चितच महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत गांभीर्याने तपासण्याची गरज अधोरेखित करणारी ठरत आहे.
तांत्रिक तपासणी करावी
माळशेज घाट मार्गावर यापूर्वी रस्त्याचा काही भाग खचल्याने अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली. या घटनेनंतर महामार्गाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि देखरेख यावर चर्चा झाली होती. रस्त्याच्या कामाशी संबंधित बाबींची तांत्रिक तपासणी करून आवश्यक ती जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
"मुरबाड शहरातील राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्याने रहदारीच्या समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा असतांना त्या कामातील त्रुटींमुळे त्या निराशेमध्ये परावर्तित झाल्या आहेत. सोनरपाडा येथे पाणी साचून राहणे, पाणी निचरा व्यवस्था अर्धवट, उड्डाणपुलावरील विद्युत प्रकाशयोजना बंद असणे, अनके ब्रीजचा वाहतुकीसाठी बंद असणे, अशा अनेक त्रुटींमुळे मुरबाडकर राष्ट्रीय महामार्ग विभागावर नाराज आहे. याबाबत गंभीरपणे लक्ष देऊन वाहतुकीचे सर्व प्रश्न मार्गी न लावल्यास आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ."
- चेतनसिंह पवार (ठाणे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष