पालघर: जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत अनेक त्रुटी समोर येत आहेत.नियमित फेऱ्यांपासून ते बसच्या देखभालीपर्यंत अनेक पातळ्यांवर समस्या असल्याचे समोर आले आहे. अनेक आगारांमधील एसटीच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे आगारातून 237 फेऱ्या होत असल्याची माहिती आगार प्रमुखांकडून देण्यात आली. परंतु चालक-वाहकांची कमतरता, बसची अनुपलब्धता आणि तांत्रिक बिघाड सारखी प्रमुख कारणांमुळे वरई , तांदुळवाडी, चहाडे परिसरातील फे-या रद्द होत असल्याच्या प्रवाशांकडून सांगण्यात येते. काही ग्रामीण मार्गांवर तर दिवसातून एकच फेरी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
अनेक आगारांमध्ये दुरावस्था झालेल्या दोन पत्र्याच्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, शौचालयाचा अभाव आहे. काही ठिकाणी हिरकणी कक्ष नसल्याने महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेचा अभावही प्रकर्षाने जाणवतो.
सफाळे आगारात 16 बसेस जुन्या असून अनेक बसची अवस्था अत्यंत खराब असून सीट फाटलेल्या, खिडक्या तुटलेल्या, छत गळतीचे प्रकार दिसून आले. सफाळे आगारातील अनेक बस दुरुस्ती करण्यात आल्या असून व्यवस्थित सुरू असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.
सफाळे आगारात 9 नवीन एसटी बस मिळाल्या असून आणखी 5 नवीन बसेस ची मागणी करण्यात आली आहे. सफाळे आगारांमधील गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सफाळे आगाराच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे.निधीअभावी कामे बांधकाम अपूर्ण राहिल्याचे सांगण्यात येते.
इमारतीचे काम पूर्ण होतं आले असून उद्घाटनाचा मुहूर्त लागणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लोकप्रतिनिचे दुर्लक्ष होताना दिसून येते. एसटी मार्गांवरील अनेक प्रवासी थांबे तुटलेले, मोडकळीस आलेले असून काही ठिकाणी नाम फलकही नाहीत. त्यामुळे प्रवाशांना योग्य माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.
दूरवरच्या फेऱ्यांवर जाणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी राहण्याची सोय नसल्याचेही निदर्शनास आले. काही ठिकाणी त्यांना बसमध्येच विश्रांती घ्यावी लागते. जिल्ह्यातील एसटी सेवा सध्या अनेक अडचणींनी ग्रासलेली असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा एसटी वरील प्रवाशांचा विश्वास कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बसचा तुटवडा; जुन्या बसचे प्रमाण जास्त
जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये उपलब्ध बस गाड्यांपैकी जुन्या गाड्यांची संख्या मोठी आहे. नवीन गाड्यांची मागणी केल्यानंतरही पूर्तता होत नाही.सफाळे आगारात नऊ नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. परिणामी, वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाणे कठीण होत आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशी संध्याकाळच्या वेळेस उभे राहून प्रवास करत असल्याचे चित्र दिसून आले.
बसच्या देखभालीसाठी आणि 5 नवीन बस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.मनुष्यबळ आणि निधी मिळाल्यास सेवा सुधारण्याचा प्रयत्न करू,- सतीश मालचे, आगारप्रमुख