Knife Attack: मुरबाडमध्ये 13 वर्षीय पुतण्याकडून काकूवर जीवघेणा हल्ला

चोरीदरम्यान पकडले जाण्याच्या भीतीने केला चाकूहल्ला
knife attack
knife attackPudhari
Published on
Updated on

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: तालुक्यातील शिवळे गावात एका अल्पवयीन मुलाने आपल्याच काकूवरच चाकूने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या 13 वर्षीय मुलाने पकडले जाण्याच्या भीतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून, 4 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा मुलगा घराच्या मागील खिडकीवाटे चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला. तो कपाट उघडून चोरी करत असताना त्याच्या काकूला यावेळी जाग आली.

दरम्यान काकूने यावेळी या मुलाला चोरी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने स्वतःकडे असलेल्या धारदार चाकूने काकूच्या छातीवर, पोटावर, मानेवर आणि पाठीवर वार केले.

knife attack
Thane Water Crisis: ठाण्यात पाणीटंचाईचे मोठे संकट; शहरात 25 टक्के पाणीकपात

सदर घटनेमध्ये मुलाने काकूवर चाकूने वार करून जखमी केले. या महिलेच्या पाठीवर धारदार शस्त्राचे खोलवर वार करण्यात आले आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. घटनेदरम्यान जखमी अवस्थेत काकूने आरडाओरडा करताच फिर्यादी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तातडीने धाव घेतली.

यावेळी आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. पैसे हवे होते म्हणून चोरी करायला आलो आणि पकडले गेलो म्हणून चाकूने मारले, अशी कबुली त्याने कुटुंबीयांसमोर दिली.

आरोपीवर गुन्हा दाखल

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अल्पवयीन आरोपीने आपल्या काकूवरच चाकूने हल्ला करत टोकाचे पाऊल उचलत तिला जखमी करण्यात आले आहे. यावेळी या जखमी महिलेला तातडीने मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

knife attack
Tempo Overturn Traffic Jam: डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावर टेम्पो पलटी

या घटनेप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या 109, 311 कलमांनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एका अल्पवयीन मुलाने आपल्याच काकूवर अशा प्रकारचे क्रूर कृत्य केल्यामुळे संपूर्ण शिवळे गावामध्ये भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news