विरार : वसई-विरार शहरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, वाढता उकाडा आणि वीज वापरातील सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता महावितरणने वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शहरातील विविध भागांमध्ये एकूण ८० नवीन रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यापैकी अनेक रोहित्रांची उभारणी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये रोहित्रांवरील अतिरिक्त भार, तांत्रिक बिघाड, वीज खंडित होणे तसेच फ्यूज उडणे यांसारख्या समस्या वारंवार समोर येत होत्या. त्यामुळे नागरिकांना ऐन उकाड्यात मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. वाढत्या वीज वापरामुळे विद्यमान यंत्रणेवर ताण निर्माण झाल्याने या समस्यांमध्ये वाढ आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरणने तातडीने उपाययोजना हाती घेत शहरातील विविध भागांसाठी नव्या रोहित्रांची उभारणी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ६३० केव्ही क्षमतेची ४० आणि १२०० केव्ही क्षमतेची ४० अशी एकूण ८० नवीन रोहित्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे २५ रोहित्रांची उभारणी गेल्या असून आठ दिवसांत पूर्ण झाली, उर्वरित आवश्यक ठिकाणीही प्राधान्याने काम सुरू आहे.
महावितरणच्या या उपक्रमामुळे ज्या भागांमध्ये वीजेवरील भार जास्त आहे, त्या ठिकाणी भाराचे संतुलन साधण्यास मदत होणार आहे. परिणामी वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, वीजपुरवठ्यातील अडथळे आणि ग्राहकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरातील ज्या भागांमध्ये विजेची मागणी झपाट्याने वाढली आहे आणि जिथे तातडीने अतिरिक्त क्षमतेची गरज आहे. नागरिकांनीही वीजेचा जबाबदारीने वापर करावा, अनधिकृत जोडण्या टाळाव्यात आणि वीजविषयक कोणतीही अडचण आल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांमुळे वसई-विरारमधील वीजपुरवठा सक्षम आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.