Mokhada Water Crisis Pudhari
पालघर

Mokhada Water Crisis: कुर्लोद मानीचापाडा येथील विहिरीत गढूळ पाणी

आम्ही कोणते पाणी प्यायचे ? असा सवाल आता येथील ग्रामस्थांनी विचारला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा: मान्सून धो धो बरसला, जिकडे तिकडे पाणीच पाणी करून गेला,यामुळे आता पाणीटंचाई राहणार नाही असे आशादायी चित्र असताना मोखाडा तालुक्यातील कुर्लोद मानीचापाडा या ठिकाणी मात्र वेगळीच अडचण येथील लोकांसमोर उभी राहिली आहे नदीपासून एक किलोमीटर उंचीवर असलेल्या या पाड्यात जवळपास 30 ते 35 घरे आणि शंभर ते 125 नागरिक राहतात उन्हाळ्याची चाहूल लागताच हा पाढा उंचीवर असल्यामुळे येथील विहीर आटते व येथील लोकांना खाली उतरून नदीच्या पाण्यावर संपूर्ण उन्हाळाभर अवलंबून राहावे लागते.

मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर पाण्यात असलेल्या विहिरीला पाणी येते मात्र सध्या संपूर्ण शेतात पाणी झाले आहे. यामुळे विहिरीला पाणी आले मात्र ते अतिशय गढूळ असल्याने पिण्यायोग्य नाही आणि नदीचा प्रवाह जोरात असून तो देखील गढूळ असल्यामुळे येथील नागरिकांसमोर 'इकडे नदी तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झाली असून आम्ही कोणते पाणी प्यायचे ? असा सवाल आता येथील ग्रामस्थांनी विचारला आहे.

उशिरा आलेल्या पावसाने पूर्ण राज्याला झोडपून काढले. यावेळी अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटणे, काही गावपाड्यांचं नुकसान होणे,काही घरे देखील पडली पावसामुळे अशा अनेक नुकसानीच्या घटना घडत असतानाच मोखाडा तालुक्यातील मानीचापाडा या ठिकाणी मात्र भर पावसात देखील येथील नागरिकांना पाणी कोणते आणि कसे प्यायचे असा प्रश्न सतावत आहे.

येथील नागरिकांना उन्हाळ्यात तर पाणीटंचाई असते मात्र पाण्यापासून खाली एक किलोमीटर खोलीत उतरून वाहणाऱ्या नदीचे स्वच्छ पाणी भरून ते आपली तहान भागवत असतात यामुळे किमान पावसाळ्याच्या चार महिने तरी त्यांच्या गावात असलेल्या विहिरीचे पाणी प्यायला मिळावे अशी आशा येथील नागरिकांना असते.

मात्र सध्या त्या विहिरीतले पाणी प्रचंड गढूळ झाल्याने ते सुद्धा पिण्यायोग्य नाही आणि या भर पावसात एक किलोमीटर नदीवर कसं जायचं आणि नदीचा मोठा वाहता प्रवाह यातून पाणी कसं भरायचं आणि भरलं तरी सध्या नवीन पाऊस असल्यामुळे नद्यांचे वाहणारे पाणी देखील गढळ आहे यामुळे साथीचे रोग देखील पसरू शकतात अशी भीती येतील नागरिकांना आहे . अशा बिकट परिस्थितीमध्ये सध्या याच पाण्यावर येथील नागरिक अवलंबून असल्याने यासाठी शासनाने काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

मागील वर्षी अशाच पावसाळ्यात जव्हार तालुक्यातील राजेवाडी या ठिकाणी संपूर्ण गावात गॅस्ट्रोची साथ पसरली होती यात काही नागरिकांचा मृत्यू देखील झाला होता यावेळी झाडून सगळे प्रशासन जागे झाले होते. आणि योग्य ती उपाययोजना केली होती अशीच परिस्थिती या मानीचापाडा या ठिकाणी देखील होऊ शकते. यामुळे प्रशासन एखाद्या नागरिकाचा साथीच्या रोगाने, गढूळ पाणी पिल्यानंतर मृत्यू झाल्यानंतरच जाग होणार आहे का असा सवाल उपस्थित होत असून शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT