वसई : दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तर भारतीय नागरिकांकडून सर्वत्र छठ पुजा उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवादरम्यान भाविकांकडून सूर्यास्त व सूर्योदयाच्या दरम्यान समुद्र, तलाव, नदी किनारे येथे पुजेचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी पालक मंत्री गणेश नाईक यांच्याशी तसेच आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
या पुजेच्या वेळी नैसिर्गक स्त्रोताच्या पाण्याचा सूर्यदेवाला अर्ध्य दिला जातो. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांतर्गत, पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतामध्ये मूर्ती विसर्जनाला मा. उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध विचारात घेऊन त्यानुसार स्थानिक प्राधिकरणांकडून विविध उत्सवादरम्यान या निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते आदेश जारी केले जातात. त्यानुसार या छठ पुजा उत्सवानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेकडून समुद्र आणि तलाव या ठिकाणी छठ पुजेसाठी नियोजन व व्यवस्था केली जाते. तथापि, यावर्षी समुद्र आणि तलाव या नैसर्गिक स्त्रोतावर छठ पुजा उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी चर्चा सुरू झाल्याने सर्व नागरिकांकडून महानगरपालिका तसेच स्थानिक आमदार यांच्याकडे संपर्क साधून याबाबत मार्ग काढण्याची विनंती करण्यात येत होती.
या चर्चेदरम्यान दोन्ही आमदारांनी असे निदर्शनास आणले की, या छठ पुजे दरम्यान समुद्र किंवा तलाव या नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्रामध्ये कोणतेही मुर्ती विसर्जन केले जात नसून, नैसर्गिक स्तोत्राच्या पाण्याचा सूर्यदेवतेला अर्ध्य दिला जातो. त्याचप्रमाणे या पुजेमध्ये वापरण्यात येणारे निर्माल्य या नैसर्गिक स्तोत्रामध्ये विसर्जन केले जाणार नाही यासाठी समुद्र- तलाव या ठिकाणी निर्माल्य व इतर पुजा साहीत्य एकत्र जमा करण्यासाठी मोठ्या कलशांची व्यवस्था करून स्वयंसेवकामार्फत पाणी प्रदुषित होणार नाही याची काळजी घेतल्यास, श्रध्दाळू भाविकांना, पर्यावरण रक्षणाबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा उत्सव पारंपारिक पध्दतीने उत्साहाने साजरा करता येईल. आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांनी सुचविलेल्या वरील सामंजस्याच्या मार्गावर सकारात्मक निर्णय घेऊन त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिले आहे.