Hitendra Thakur met Sharad Pawar
हितेंद्र ठाकूर यांनी घेतली शरद पवारांची भेट Pudhari File Photo
पालघर

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतली मविआचे शिल्पकार शरद पवार यांची भेट

करण शिंदे

अनिलराज रोकडे : वसई

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची त्यांच्या सिल्वरओक या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून, तर्क वितरकांना उधान आले आहे. तीन आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडी पक्षाने राज्यात सत्ता स्थापन करताना आधी महाविकास आघाडी पक्षाला आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना(शिंदे गट)-भाजप महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. मात्र गेल्या पालघर लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान महायुतीचे नेते, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातील कलगीतुरा शिगेला जाऊन तणाव वाढला होता. ही पार्श्वभूमी आणि लोकसभा निवडणुकांचे लागलेले निकाल लक्षात घेता, ठाकुरांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले पवार यांची भेट घेणे औत्सुक्याचे ठरले आहे.

राज्याच्या अधिवेशन काळात सर्वच आमदार विविध पक्षातील नेते मंडळींना भेटत असतात. मतदार संघातील कामे व योजनांचा पाठपुरावा, तसेच परस्पर संपर्क, स्नेह संवर्धन हाही त्यामागील हेतू असतो. तर काही भेटी विधान भवन परिसरात वावरताना 'देखल्या देवा दंडवत' या स्वरूपाच्याही असतात. त्यामुळे आमदार ठाकूर यांचा गेल्या चार दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, उबाठा शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर , राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार गणेश नाईक यांच्याशी गाठीभेटी आणि संपर्क झाल्याची छायाचित्रे झळकली आहेत. परंतु शरद पवार यांची भेट या कोणत्याही प्रकारात न मोडणारी आहे.

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या तीस वर्षातील राजकारणात, आपला जिल्हा आणि मतदार संघातील विकासाच्या मुद्द्यावर राज्यात सरकार बनविणाऱ्या आघाडी किंवा महायुतीला बहुजन विकास आघाडी पाठिंबा देत आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात राज्यात सत्ता स्थापन करताना आधी महाविकास आघाडीला आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना-भाजप महायुतीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने पालघर जिल्ह्यातील पक्षाचे बलाबल लक्षात घेऊन, पालघर लोकसभेची जागा बविआला सोडून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा महायुतीकडून केली होती.

मात्र शिवसेना आणि भाजपाच्या जागा वाटपात पालघरची जागा भाजपाला जाऊन, त्यांनी अॅड. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. बविआने बोईसरचे आपले आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी आधीच घोषित केलेली होती. उबाठा सेनेतर्फे भारती कामडी उमेदवार होत्या. असा येथे तिरंगी सामना होऊन, प्रचारादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकूरांविरोधात प्रखर टिका-टिप्पणी झाली. आमदार ठाकूर यांनीही या दोघा नेत्यांना आपल्या शैलीत जशासतसे प्रत्युत्तर दिले. ही कटूता ताजीच असून, त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुक निकालानंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पुढील निवडणूक लढविणार नाही. अशी घोषणा केली होती. जर ते हा शब्द पाळणार असतील, तर यंदाचे पावसाळी अधिवेशन हे त्यांच्यासाठी शेवटचे अधिवेशन ठरावे! अश्या अर्थाने या त्यांच्या व्यापक संपर्क अभियानाकडे पाहिले, तर शरद पवार आणि अन्यही सर्वच नेत्यांचा आमदार ठाकूर निरोप तर घेत नव्हते? अशाही प्रश्नाला थोडा वाव आहे.

SCROLL FOR NEXT