डहाणू : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासाठी सुरू असलेली गौण खनिजांची वाहतूक स्थानिक नागरिकांनी रोखून धरली. वाढवण आणि वरोर गावातील बंदरविरोधकांच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे अखेर भरावाचे काम मिळालेल्या कंत्राटदार कंपनीला आपले सर्व ट्रक माघारी वळवावे लागले.
प्रस्तावित वाढवण बंदराची उभारणी समुद्राच्या आत करण्यात येणार असून, बंदराला जोडण्यासाठी वरोर ते तवा महामार्ग आणि वरोर ते नेवाळे रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या दोन्ही पोहोच मार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, लवकरच प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, समुद्रातील प्रस्तावित बंदराला जोडणाऱ्या महामार्ग आणि रेल्वे मार्गासाठी वरोर किनारपट्टी परिसरात भराव टाकण्याच्या उद्देशाने माती, मुरूम व दगड यासारख्या गौण खनिजांची अवजड वाहनांद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने वाढवण बंदर प्रकल्पासाठी अद्याप कोणतेही स्थापत्य काम सुरू करण्यास परवानगी दिलेली नसून, केवळ सर्वेक्षणालाच मंजुरी आहे, असा दावा करत स्थानिक नागरिक आणि बंदरविरोधक संतप्त झाले.
स्थानिकांनी गावाच्या वेशीवर गौण खनिजांनी भरलेले ट्रक अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी स्थानिकांची दिशाभूल करून बंदर प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांना समज देत रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, बंदर प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवत आंदोलकांनी वाहतूक सुरू होऊ देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर स्थानिक नागरिकांच्या आक्रमक भूमिकेपुढे नमते घेत कंत्राटदार कंपनीने सर्व ट्रक माघारी वळविले. त्यानंतरच आंदोलक शांत झाले.
आगामी काळात संघर्ष वाढण्याची शक्यता
या घटनेमुळे वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील स्थानिकांचा रोष पुन्हा एकदा उफाळून आला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापूर्वी कोणतेही काम सुरू झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आगामी काळात या प्रकल्पाभोवती संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.