Palghar tribal ashram school pudhari photo
पालघर

Palghar tribal ashram school : मासवण आश्रमशाळेच्या कारभारावर आमदार गावितांकडून प्रश्नचिन्ह

विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर तालुक्यातील मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत एका महिन्याच्या कालावधीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने आश्रमशाळेतील व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी आश्रमशाळेला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य, निवास आणि मूलभूत सुविधांच्या व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.

आश्रमशाळेची पाहणी केल्यानंतर आमदार गावित यांनी आश्रमशाळेचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या आदिवासी सेवा मंडळाच्या संचालकांची भेट घेतली. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याबाबत त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला.

विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या गंभीर घटनेनंतरही आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष आश्रमशाळेत आले नसल्याचा आरोप आमदार गावित यांनी केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत संस्थेची उदासीनता दिसून येत असून, ही संस्थाचालकांची मुजोरी असल्याची टीका त्यांनी केली.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, गडचिरोली जिल्ह्यातील कारवाईच्या धर्तीवर मासवण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार गावित यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ही आश्रमशाळा शासनाने ताब्यात घ्यावी आणि शाळेचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या चौकशी आणि पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मासवण आश्रमशाळा मृत्यूप्रकरणी आंदोलन स्थगित

मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असताना दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांच्या वतीने चहाडे नाका येथे सुरू करण्यात आलेले आंदोलन अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी मनोज रानडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी नियुक्त चौकशी पथकाकडून तीन दिवसांच्या आत चौकशी प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. चौकशी अहवालामध्ये संस्था, अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रानडे यांनी दिले.

आश्रमशाळेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह!

पालघर, पालघरच्या मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर आता विविध स्तरातून आश्रमशाळेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी संस्थापक अभिजित दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत आश्रमशाळेला भेट देत परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी वाटर हिटर बंद असल्याने विद्यार्थ्यांना पहाटेच्या वेळी थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे समोर आले.

पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरची दुरुस्ती वर्षभरापूर्वी झाल्याचे सांगण्यात आले, तर आश्रमशाळा परिसरात अस्वच्छता आढळून आली. विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारलेल्या संस्था चालक आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सीजेपीच्या प्रतिनिधींनी केला आहे.या पाहणीचा सविस्तर अहवाल संस्थापक अभिजित दिपके यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती रुपाली होडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT