पालघर/कासा : मुंबई-अहमदाबाद महा मार्गावरील धानीवरी येथे सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला असून या दुर्घटनेतील 12 मृतदेहांवर मंगळवारी बापूगाव येथे शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, विविध आमदार, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि मृतांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली होती.
सोमवारी दुपारी झालेल्या या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जणांचा कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या 17 जणांवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर आरोग्य विभागाने तातडीने समन्वय साधत अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत मागवली. रात्री उशिरापर्यंत, तब्बल अडीच वाजेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी सकाळपासून कासा उपजिल्हा रुग्णालय परिसरात मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास शववाहिन्यांमधून मृतदेह बापूगावातील लाखात पाड्यात आणण्यात आले.
मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांचा आक्रोश उसळला. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मृतदेह तासभर शववाहिनीत ठेवून अंत्यदर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लाखात पाड्यातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अर्ध्या तासानंतर सर्व मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले आणि आदिवासी परंपरेनुसार विधी पार पाडण्यात आले.
दरम्यान, अंत्यविधीस्थळी पोहोचलेल्या मंत्री अशोक उईके यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.यावेळी आमदार विनोद निकोले, राजेंद्र गावित, हरिश्चंद्र भोये, विलास तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मृतांमधील तेरा पैकी बारा जण बापुगावच्या लाखात पाड्यातील रहिवाशी होते.
“या दुर्दैवी अपघातातील कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. जखमींवर योग्य उपचार करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाईल, तसेच जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पालकत्व आदिवासी विकास विभागाने स्वीकारले आहे,” असे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.
अंत्यसंस्कारानंतर त्यांनी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासन, जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत विविध सूचना दिल्या. जखमींच्या उपचारात कोणतीही हलगर्जी होणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, या अपघातप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक आणि कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत व्यक्तींची नावे
सुरेश रत्ना लाखात (वय.45)
पांडू गणपत लाखात (वय.45)
कल्लू गोविंद लाखात (43)
सुनील अर्जुन दांडेकर
चिमा गोविंद कुरहाडा (वय.75)
अजय अहाडी (वय 18)
आयुष सिताराम लाखात (वय.14)
सागर नामदेव शेंडे (वय.17)
वंदना शिवराम वळवी (वय.38)
सलोनी शिवराम वळवी (वय.11)
रियांशी संतोष लाखात (वय. 03)
सारिका संतोष लाखात (वय.30)
नमिता विठ्ठल दांडेकर