Marathi Dialects Preservation Pudhari
पालघर

Marathi Dialects Preservation: मराठी बोलींचा जागर! गोवेली येथे ‘बोलींचा जागर’ उपक्रमाचे भव्य आयोजन

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वारली, कुपारी बोलींसह लोकसंस्कृतीचे सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून विविध बोलींनी नटलेली, समृद्ध आणि सशक्त अशी सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या बोली या मराठी भाषेच्या वैभवाचे प्रतीक असून त्या त्या प्रदेशाचा इतिहास, लोकजीवन, संस्कृती आणि सामाजिक ओळख जपणाऱ्या आहेत. या बोलींचे जतन, संवर्धन आणि अभ्यास व्हावा, या व्यापक उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‌‘बोलींचा जागर‌’ या विशेष उपक्रमाचे आयोजन गोवेली येथे करण्यात आले आहे.

23 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत गोवेली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय तसेच विविध विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ‌‘बोलींचा जागर‌’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून गोवेली येथे हा भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार असून, त्यानंतर सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्य कार्यक्रमात मराठीतील विविध बोलींचा जागर, स्थानिक वारली व कुपारी या बोलींमधील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण, बोलीभाषांवरील संवाद तसेच बोलीभाषा अभ्यासकांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून बोलीभाषांची ताकद, त्यामागील लोकसंस्कृती आणि परंपरेचे दर्शन उपस्थितांना घडणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. नेहा सावंत आणि डॉ. रुपेश कोडिलकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र घोडविंदे विराजमान राहणार आहेत. डॉ. उदय सामंत, मंत्री, मराठी भाषा व उद्योग, डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग तसेच अरुण गिते, भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

भाषा अभ्यासक, साहित्यप्रेमींची उपस्थिती

कार्यक्रमाचे संयोजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून प्रा. हरेंद्र सोष्टे, मराठी विभाग प्रमुख आणि प्रा. सतीश लकडे, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत. मराठी भाषेच्या विविध बोलींचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या या ‌‘बोलींचा जागर‌’ कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT