Monsoon Road Damage Pudhari
पालघर

Monsoon Road Damage: वाडा-भिवंडी महामार्गावर साचली चिखलाची तळी

कुडूस, खुपरी भागात खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ सुरूच

पुढारी वृत्तसेवा

वाडा: मनोर-वाडा-भिवंडी हा महामार्ग कितीही चांगला बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला समस्यांची किनार कायम राहील असेच दिसून येत आहे. वाडा ते अंबाडी हा मार्ग सध्या जरी सुस्थितीत असला तरी खुपरी ते कुडूस या भागात हा महामार्ग लोकांचा रक्ताचे पाणी करत आहे. कुडूस पट्ट्यात जागोजागी अपूर्ण कामांमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हे खड्डे नसून जणू चिखलाने भरलेली तळी आहेत असे वाहनचालक संतापाने सांगतात.

वाडा ते भिवंडी या महामार्गावर अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे एकेरी तर काही ठिकाणी दुहेरी मार्ग बनवण्यात कंत्राटदाराला यश आले आहे. अजूनही अनेक ठिकाणी मात्र थातूरमातूर कामे करून अर्धवट सोडलेल्या कामांमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खूपरी गावाजवळ एका पुलाचे काम जवळपास वर्षभरापासून सुरू असून अजूनही ते पूर्ण न झाल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खुपरी गावाच्या पुढे वन विभागाच्या हद्दीत तर खड्ड्यांची जणू चादर पसरली आहे.

वाडा ते ओनिडा जितका वेळ वाहनचालकांना लागतो तितकाच वेळ आता ओनिडा कंपनी ते कुडूस या अवघ्या दीड किलोमीटर अंतरासाठी लागतो. जागोजागी अपूर्ण कामे सोडलेली असून मोठमोठ्या खड्ड्यांनी हा रस्ता व्यापला आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कुडूस गाव जवळ वाहन चालविणे जिकिरीचे बनले आहे. लहान मोऱ्या नव्या बनविण्यात आल्या खऱ्या मात्र त्यावर डांबरीकरण नीट न केल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वैतरणा नदीवरील पुलाचे काम हाती घेऊन जमाना झाला मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ टोलवाटोलवी करीत असून कंत्राटदार कंपनीच्या कुठल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा असा प्रश्न सर्वांना पडतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT