पालघर : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार असलेल्या मनोर येथील ग्रामीण रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णांचा ताण वाढत आहे. दररोज तब्बल 150 ते 200 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असून, दरमहा सुमारे दीडशेहून अधिक महिलांची प्रसूती येथे होत आहे.
सफाळे, विक्रमगडसह परिसरातील अनेक ग्रामीण व दुर्गम भागांतून रुग्ण उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल होत असल्याने सध्या ५० खाटांची क्षमता असलेले हे रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. वाढत्या रुग्ण संखेचा विचार करता लवकरचचा महामार्गा लगतच्या ट्रामा केअर रुग्णालयाच्या उदघाटनाची प्रतीक्षा आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरत आहे. प्राथमिक उपचारांपासून आपत्कालीन सेवांपर्यंत तसेच प्रसूती, शस्त्रक्रिया आणि विविध तपासण्यांच्या सुविधा येथे उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहरातील रुग्णालयात जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर अनेक आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयाचे महत्त्व वाढले आहे.
रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाबरोबरच आंतररुग्ण विभाग आणि २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहे. प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, सामान्य प्रसूती तसेच सिझेरियन प्रसूतीची सुविधाही येथे उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील गर्भवती महिलांसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरत आहे. दरमहा दीडशेहून अधिक प्रसूती होत असल्याने प्रसूती विभागावरही मोठा ताण आहे.
रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी सेवा उपलब्ध आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटरची सुविधा असून, कुपोषित बालकांवर उपचार व पोषणासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. किशोरवयीन मुला-मुलींसाठी स्वतंत्र आरोग्यविषयक सेवा उपलब्ध असून त्यांची तपासणी व समुपदेशन करण्यात येते.आठवड्यातून एकदा लसीकरणाची सुविधाही रुग्णालयात दिली जाते. त्यामुळे परिसरातील बालक व गर्भवती महिलांना नियमित लसीकरणासाठी मोठा आधार मिळत आहे.
१०२ आणि १०८ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांचाही परिसरातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विशेषतः प्रसूतीनंतर महिलांना घरपोच सुविधा देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे.मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विविध शासकीय योजनांतर्गत मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांना मोफत भोजनही दिले जाते.
गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी रुग्णालयाकडे तीन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. दरम्यान मनोर ग्रामीण रुग्णालयासमोरील आणखी एक मोठी समस्या म्हणजे अपुरी जागा. रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असल्याने वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने गैरसोय होते.
दुरुस्ती कामांचे प्रस्ताव सादर
रुग्णालयातील पाणी व्यवस्था, ड्रेनेज लाईन, सेप्टिक टँक, शौचालये, बाथरूम तसेच इतर आवश्यक किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. याशिवाय विद्युत दुरुस्तीच्या कामांचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.