Silver Pomfret Shortage Reasoning
पालघर : राज्य मासा असलेल्या सिल्व्हर पापलेटच्या उत्पादनात गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत मोठी घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन सरासरी वीस ते तीस टक्क्यांवर आले आहे. निर्यातीसाठी मोठी मागणी असलेल्या आणि मच्छीमारांना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्या सुपर पापलेट (सरंग्याच्या) उत्पादनात 95 टक्के घट झाली असून उत्पादन पाच टक्क्यांवर आले आहे.
पापलेटच्या उत्पादनात घट का झाली?
कव पद्धतीने केल्या जाणार्या मासेमारीत होणारी पापलेटच्या पिल्लांची पकड तसेच अधिक नफा मिळवण्यासाठी बेसुमार मासेमारीमुळे पापलेटच्या उत्पादनात घट मच्छीमार नेत्यांचे म्हणणे आहे. शासनाकडून सिल्व्हर पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे, परंतु पापलेटच्या पिल्लांची होत असलेली मासेमारी रोखण्यासाठीच्या उपाययोजना ठोस केल्या जात नाहीत.
केरळ सारख्या राज्यात अवैध मासेमारी रोखण्यासह दुर्मिळ होत चाललेल्या माशांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी स्वतंत्र अंमलबजावणी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात पर्ससिन मासेमारी, एलईडी मासेमारी तसेच बंदी काळातील मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी विभागाची निर्मितीची मागणी मच्छीमार करत आहेत.
31 मे पासून 01 ऑगस्टपर्यंत असलेल्या दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीच्या कालावधीत किमान पंधरा दिवस ते एक महिन्यांची वाढ करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. तसेच मासेमारी बंदी काळात होणारी मासेमारी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी कडे मच्छिमार मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष वेधत आहेत.
ड्रोनच्या माध्यमातून बंदी काळात होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.समुद्रात ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करून बंदी काळातील मासेमारी रोखण्यात काही अंशी यश आले आहे. बंदी काळात होत असलेली संपूर्ण मासेमारी रोखण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पापलेटच्या पिल्लांची पकड टाळण्यासाठी मच्छीमारांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.