Central Kitchen Scheme Maharashtra pudhari photo
पालघर

Central Kitchen Scheme Maharashtra : आश्रमशाळा 'सेंट्रल' किचन योजनेचा मुद्दा 'सेंटर'वर

तीन महिन्यात अभ्यास करून अहवाल सादर होणार?

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांमध्ये 2015 पासून सेंट्रल किचन योजना सुरू करण्यात आली ही योजना सुरू होण्याअगोदर प्रत्येक आश्रम शाळेत स्वयंपाकी कामाठी अशी पदे मंजूर करून अशा कर्मचाऱ्यांद्वारे आश्रम शाळांमध्येच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात येत होते.

अशा वेळी अनेकदा अधिवेशनामध्ये जेवणाच्या बाबतीत तक्रारींच्या आधारावर तारांकित प्रश्न विचारले जात होते. तर न्यायालयाकडून देखील सुमोटो म्हणजे स्वतःहून दखल घेऊन याबाबत सरकारला वेळोवेळी यात सुधारणा करण्याच्या सूचना देखील देण्यात येत होत्या. याची दखल घेऊन त्या सेंट्रल किचन योजनेची सरकारने सुरुवात केली.

गेल्या 11 वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या सेंट्रल किचन योजनेबाबत देखील अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी कडून विद्यार्थ्यांकडून पालकांकडून उपस्थित होत्या. मात्र त्याची म्हणावी तशी दखल आजवर आदिवासी विकास विभाग किंवा सरकारने घेतली नव्हती मात्र नुकत्याच आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्यभरात सुरू केलेल्या उपोषणामुळे आता हा सेंट्रल किचन योजनेचा मुद्दा सेंटरवर आला आहे. हे नक्की कारण की या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांमध्ये एक मागणी या सेंटर किचन बंद करण्याची देखील आहे.

यावर सरकारने याबाबतीत पुन्हा अभ्यास करून तीन महिन्यात याबाबत वस्तूस्थिती अहवाल देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. 2015 च्या आधी जेव्हा आश्रम शाळांमध्ये अन्न शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात येत होते त्यावेळी अनेकदा पुरवठादारांकडून साहित्य पुरवठा होताना बऱ्याचदा भाजीपाला ताजा नसणे, हलक्या प्रतीचा असणे, अशा तक्रारी येत होत्या.तर विजे अभावी पीठ दळले नाही अशा कारणांवरून सलग दोन ते तीन दिवस नुसत्या भातावर देखील विद्यार्थ्यांना गुजराण करावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी काही आश्रम शाळांमधून समोर येत होत्या. तर भातात खडे असणे याशिवाय विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी मिळणारे किराणा साहित्य लंपस होण्यावरून देखील अनेकदा मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाल्याचे देखील अनेकदा दिसून आले होते.

एकूणच आश्रम शाळांमध्ये शिजून दिलेल्या अन्न भोजन बाबत देखील प्रसारमाध्यमांमधून आणि शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक यांच्याकडून देखील बऱ्याचदा तक्रारी निर्माण होत होत्या यामुळे शासनाने ही योजना कार्यान्वित केली यामध्ये सकाळचा पौष्टिक नाष्टा दुपारी जेवण पुन्हा सायंकाळी बिस्किट चिवडा या पद्धतीने सुका नाष्टा आणि रात्री पुन्हा जेवण सध्या पुरविले जात आहे.

मात्र यामध्ये देखील आता तक्रारी वाढल्या असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत तीन ते चार तालुके येत असून यामध्ये किमान 28 ते 30 शासकीय आश्रम शाळांचा समावेश असतो मात्र हे सेंट्रल किचन म्हणजेच मध्यवर्ती स्वयंपाक गृह हे यातील बऱ्याच आश्रम शाळांपासून वीस ते तीस किमी अंतरावर असल्याकारणाने आणि एकाच ठिकाणाहून एवढ्या आश्रम शाळांसाठी स्वयंपाक करावा लागत असल्याने पहाटे केलेला स्वयंपाक दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना मिळतो यामुळे ते अन्न थंड होते किंवा त्याला चव येत नाही अशा प्रकारच्या तक्रारीत देखील वाढ झालेली आहे .

याशिवाय एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागत असल्यामुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया घाई गडबडीची होऊन कधी कधी चपाती कच्ची राहणे किंवा भात बरोबर न शिजणे अशाही तक्रारी वाढत चालले आहेत आणि याबाबतीमुळेच आदिवासी विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणांमध्ये हे मध्यवर्ती किचन बंद करावे अशी मागणी त्यांनी केली होती.

सेंट्रल किचन योजनेचे फायदे

1. सकस आणि हायजेनिक जेवण : मशीनने बनतं, त्यामुळे धूळ, धूर नाही. 4 वेळा जेवण - नाश्ता, दुपार, संध्याकाळचा खाऊ, रात्रीचे जेवण मिळते.

2. मुख्याध्यापकांचा वेळ वाचतो : आधी किराणा आणणे, स्वयंपाकी बघणे, हिशेब ठेवणे यातच मुख्याध्यापकांचा दिवस जायचा. आता ते फक्त शिक्षणावर लक्ष देऊ शकतात.

3. कुपोषण कमी : पालघर नाशिक सारख्या भागात कुपोषण जास्त होतं, तिथे रोज मेनूनुसार डाळ, भाजी, अंडी,चिकन पण दिलं जातं.

4. भ्रष्टाचार कमी : आधी प्रत्येक शाळेत धान्याचा हिशेब व्हायचा, आता एकाच ठिकाणी वजन, क्वालिटी चेक होतं.

सेंट्रल किचन चे तोटे?

1. गरम जेवण नाही, चव नाही : सकाळी 6 वाजता बनलेलं जेवण 50-60 KM लांब शाळेत 11 वाजता पोहोचतं, तोपर्यंत थंड होतं. आदिवासी मुलांना वरई, नागली, किंवा अनेक जंगली भाजीची सवय, पण किचन मध्ये शक्यतो शहरी मेनूच बनतो.

2. गावातील महिलांचे रोजगार गेले : आधी प्रत्येक आश्रमशाळेत 3-4 स्थानिक आदिवासी महिलांना स्वयंपाकी म्हणून काम मिळायचं. सेंट्रल किचन आल्यावर ते गेलं हे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या पदांना मंजुरीच नाही.

3. अन्न वाया जाते : बऱ्याचदा विद्यार्थ्यांची संख्या कळवली जाते अशावेळी मुले रांगेत उभे राहून जेवण घेतात त्यातून वाढताना किंवा घेताना एकदा जास्त प्रमाणात जेवण घेतले जाते तेवढे जेवण न जेवले गेल्यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT