पालघर: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाकडून जिल्ह्यातील सोळा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. भरारी पथकाच्या पाहणीत कृषी सेवा केंद्रातुन जादा दराने विक्री करणे, साठेबाजी तसेच खत खरेदीसोबत इतर साहित्य खरेदी करण्याची सक्ती, साठा रजिस्टर न ठेवण्या सारख्या अनियमिता आढळून आल्या. भरारी पथकाच्या अहवालाअंती जिल्हा कृषी अधीक्षकांकडून परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत 209 कृषी सेवा केंद्र आहेत. खरीप हंगाम पूर्व कामांच्या तयारीसाठी शेतकरी बी-बियाणे, खते, यंत्रसामग्री आदी खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे जाऊ लागले आहेत.वाढती मागणी पाहता काही केंद्राकडून बियाणे, खते, औषधे व इतर साहित्य अवाजवी दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात आल्या होत्या.
पालघर तालुक्यातील शिगाव येथील रूपक कृषी सेवा केंद्र, नागझरी येथील रेणुका कृषी सेवा केंद्र, हरणवाडी येथील यश कृषी सेवा केंद्र, बोईसर येथील टेक्नो स्टार ऍग्रो कृषी सेवा केंद्र, बोईसर (मान) येथील वितेश कृषी सेवा केंद्र, नावझे येथील गवळी ऍग्रो सेंटर केंद्र, केळवे येथील इंदाई ऍग्रीकल्चर केंद्र वसईतील भुईगाव लॉरेन्स खत डेपो केंद्र, जव्हार तालुक्यातील सिद्धार्थ कृषी सेवा केंद्र, डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील सुयोग ऍग्रो सेंटर, चारोटी येथील कृषिरत्न सेवा केंद्र, रोहित कृषी सेवा केंद्र सरावली येथील प्रिया कृषी सेवा केंद्र आणि न्यू लकी कृषी सेवा केंद्र यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली.
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईविरोधात अपील करण्याची संधी कृषी सेवा केंद्रधारकांना आहे. तेथे त्यांना आपले म्हणणे आणि पुरावे मांडण्याचे अधिकार असुन अपिलाच्या निर्णय आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल किंवा पुढील हंगामापर्यंत परवाना निलंबित ठेवले जाऊ शकतात.
भरारी पथकाकडून नियमित होतेय तपासणी
विविध कृषी सेवा केंद्रांवर साठेबाजी करणे, खतांच्या खरेदीसह इतर कृषी साहित्याची खरेदीची जबरदस्ती करणे,खतांची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, साठा बुक, ई पॉस मशीनमध्ये आवश्यक नोंद नसणे, कृषी साहित्याची खरेदी स्रोत्र नमूद नसणे, साठा फलक, अदययावत भावफलक भरारी पथकाद्वारे तपासली जात आहेत.
खरीप हंगामाआधी भरारी पथकामार्फत कृषी सेवाकेंद्राची तपासणी केली जाते.या तपासणी अंतर्गत यामध्ये इ पॉज मशीनमधील डाटा आणि प्रत्यक्ष साठा यातील तफावत भावफलक नसणे, साठेबाजी सारखे प्रकार आढळून आल्याने परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.- निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधीक्षक पालघर.