LPG Shortage Maharashtra Pudhari
पालघर

LPG Shortage Maharashtra: प्राधान्य गट, अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार केरोसीनचा पुरवठा

ग्रामीण भागात 45 दिवसांची प्रतीक्षा; पालघर जिल्ह्यासाठी 9.32 लाख लिटर केरोसीनची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विरार : घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागात सुमारे 45 दिवस तर शहरी भागात जवळपास 25 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वयंपाक व दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केरोसीनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी एकूण 9 लाख 32 हजार लिटर केरोसीनची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात पर्यायी साधनांची कमतरता असल्याने समस्या अधिक तीव्र बनली आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून केरोसीन वितरण व्यवस्था बंद अवस्थेत होती. त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावरील परवाना धारक तसेच ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडे केरोसीनचा पुरवठा होत नव्हता. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले असून वितरण व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार आहेत.

स्वयंपाक व दिवाबत्तीची अडचण दूर करण्यासाठी अंत्योदय व प्राधान्य गटातील नागरिकांना केरोसीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांकडून मागणी नोंदवण्यात आली असून त्यानुसार केरोसीनचा पुरवठा केला जाणार आहे.

जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि मोखाडा या तालुक्यांसाठी प्रत्येकी 24 हजार लिटर, तर विक्रमगड, पालघर, जव्हार, वाडा आणि तलासरी या तालुक्यांसाठी प्रत्येकी 12 हजार लिटर केरोसीनची मागणी करण्यात आली आहे. यानुसार संपूर्ण जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर केरोसीन पुरवठ्याची तयारी सुरू असून नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT