Virar local train Pudhari
पालघर

Virar local train : विरारनंतर लोकलचा दुष्काळ संपणार

डहाणूपर्यंतच्या चौपदरी मार्गामुळेे रेल्वे प्रवाशांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

चेतन इंगळे : विरार

मुंबई उपनगरी रेल्वे व्यवस्थेतील उत्तर दिशेचा कोंडमारा दूर करण्यासाठी विरार ते दहाणू रोड दरम्यानचा रेल्वे चौपदरी प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. सध्या या मार्गावर केवळ दोन रेल्वे मार्ग उपलब्ध असून त्यावरच उपनगरी लोकल, लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या तसेच मालगाड्यांची वाहतूक सुरू आहे. या मिश्र वाहतुकीमुळे लोकल सेवांची संख्या वाढवणे अशक्य झाले असून प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा तीन अंतर्गत विरार-डहाणू सुमारे 63 ते 64 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग चौपट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 578 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या कामाची सुमारे 47 टक्के प्रगती झालेली आहे. हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सध्याच्या स्थितीत विरार पुढील भागात उपनगरी लोकल सेवा अत्यंत मर्यादित असून प्रत्येक दिशेने केवळ 21 लोकल गाड्या धावतात. त्यामुळे काही वेळा प्रवाशांना 20 ते 30 मिनिटे लोकलची वाट पाहावी लागते. चौपदरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर मात्र दैनिक 100 ते 120 लोकल सेवा सुरू करण्याची क्षमता निर्माण होणार असून भविष्यात ही संख्या 200 पर्यंत वाढवता येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकल्पामुळे लोकल गाड्यांची प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून ती 10 ते 12 मिनिटांपर्यंत आणणे शक्य होणार आहे. तसेच नव्या मार्गरचनेमुळे 15 डब्यांच्या उच्च क्षमतेच्या लोकल गाड्या चालवण्याची मुभा मिळणार आहे.

चौपदरी प्रकल्पांतर्गत विरार, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर आणि डहाणू रोड या प्रमुख स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहेत. नव्या फलाटांची उभारणी, प्रवासी सुविधांचा विस्तार, सुधारित सिग्नल व्यवस्था आणि विद्युत प्रणाली यामुळे या स्थानकांचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. विशेषतः विरारनंतरच्या ग्रामीण आणि अर्धशहरी भागांना याचा मोठा फायदा होणार आहे.

लोकल सेवांवर येणारे अडथळे कमी होणार

या मार्गावरून सध्या धावणाऱ्या मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्याने उपनगरी लोकल सेवांवर येणारे अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. परिणामी लोकल गाड्या वेळेत धावतील, विलंबाचे प्रमाण घटेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व विश्वासार्ह होणार आहे. वैतरणा नदीवरील नवीन रेल्वे पुलासह अनेक महत्त्वाच्या संरचनात्मक कामांचा या प्रकल्पात समावेश आहे. ट्रॅक मांडणी, पूल, सिग्नल यंत्रणा आणि स्थानक सुधारणा टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जात असून पुढील काही वर्षांत हा संपूर्ण परिसर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने सक्षम होणार आहे.

उपनगरी विस्ताराला गती मिळणार

एकूणच विरार-डहाणू रेल्वे चौपदरी प्रकल्प हा केवळ पायाभूत सुविधा विकासाचा उपक्रम नसून उत्तर मुंबई व पालघर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. लोकल सेवा वाढ, गर्दी कमी, प्रतीक्षा वेळेत घट आणि उपनगरी विस्ताराला गती देणारा हा प्रकल्प मुंबई उपनगरी रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT