कासा ः डहाणू तालुक्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विवळवेढे येथील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातील रविवारच्या निमित्ताने भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती. रविवारची सुट्टी आणि पवित्र मार्गशीर्ष महिना यांचा योग जुळल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांचा अक्षरशः महासागर लोटला होता. एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाल्यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय उत्साहाने फुलून गेला होता.
मंदिरात एकच दिवशी झालेल्या या गर्दीला आगामी राजकीय घडामोडींचीही किनार लाभल्याचे दिसून आले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मार्गाशीर्ष महिन्याचे औचित्य साधून समूह दर्शन यात्रांचे आयोजन केले आहे. याचा परिणाम म्हणून विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिरासह, आशागड येथील संतोषी माता मंदिर आणि निकवली येथील सप्तशृंगी मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. राजकीय प्रेरणेने आयोजित केलेल्या या यात्रांमुळे भाविकांची संख्या दरवर्षीपेक्षा लक्षणीय वाढली होती. विवळवेढे महालक्ष्मी मंदिराचे स्थान मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर गुजरात राज्यातील भाविकांनीही मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गुजरातच्या सीमेला जवळ असल्याने याठिकाणी गुजराती भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. या प्रचंड गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. कासा आणि तलासरी पोलिसांनी मोठ्या फौजफाटा तैनात करून गर्दीचे नियोजन केले.