

पालघर ः पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणाऱ्या पालघर सिन्नर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी एकोणीसशे कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या विचाराधी असताना रुंदीकरणाच्या अनुषंगाने भूमीअधिग्रहणाची प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांच्या कालावधीत किरकोळ दुरुस्त्या,लहान मोठे साकव पूल आणि मोऱ्या बांधकाम करण्यापलीकडे महामार्ग विभाग जाऊ शकला नव्हता.नवीन प्रस्तावा नुसार पालघर मनोर दरम्यानच्या वीस किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण,मनोर बाजारपेठेला बाह्य वळण मार्ग आणि उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावीत आहे.
पालघर सिन्नर महामार्गावरील अपघात तसेच मनुष्य हानी रोखण्यासह प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्याच्या रुंदीकरणासह दीर्घकालीन सुधारणांसाठी नियोजन केले जात आहे. पालघर-सिन्नर पर्यंतच्या सुमारे 220 किलोमीटर लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित होऊन दहा वर्षांपूर्वी महामार्ग विभागाकडे वर्ग झाला होता.160 अ क्रमांकाच्या महामार्गात पालघर जिल्ह्यातील पालघर ते मोखाडा तालुक्यातील तोरंगण घाटापर्यंतचा सुमारे 107 किलोमीटर लांबीचा रस्ता हस्तांतरीत झाला आहे. पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.पालघर आणि गुजरात राज्यातुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा तसेच रुंदीकरण केले जाण्याची शक्यता आहे.कुंभमेळ्याच्या विकास निधीतून पालघर सिन्नर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गाचे रुंदीकरण आणि भूमी अधिग्रहणासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली. 160 (अ)क्रमांकाचा पालघर - सिन्नर राष्ट्रीय महामार्ग पालघर आणि नाशिक जिल्ह्याला जोडणारा सुमारे 220 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. पालघर शहरातील जिल्हा मुख्यालय तसेच राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामामुळे मस्तान नाका ते पालघर पर्यंतच्या सुमारे वीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर प्रवाशी तसेच अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे.कमी रुंदी तसेच घाट रस्त्यामुळे पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावत असतो.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्यापासून तोरंगण घाटाच्या हद्दीपर्यंत सुमारे 87 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे.कमी रुंदीमुळे दोन अवजड वाहने एकाचवेळी जाण्यास अडचण होते.घाट भागातील अरुंद रस्ता तीव्र वळणांमुळे धोकादायक ठरत आहे. वळणांवर वाहनांवर नियंत्रण मिळवताना अडचणी निर्माण होतात.पावसाच्या पाण्याचा निचरा आणि खड्डे बुजवण्याच्या कामातील ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावरील खड्ड्यांची संख्या वाढत असते. पालघर-नाशिक दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत वाढ होऊन प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होत असतो. त्यामुळे पालघर सिन्नर महामार्गावरील अपघात तसेच मनुष्य हानी रोखण्यासह प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती तसेच दीर्घकालीन सुधारणांसाठी नियोजन केले जात आहे.