दीपक गायकवाड
खोडाळा : घर भाड्याने देताना विशेष काळजी घ्या भाडेकरूंची सर्व माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या. जर भाडेकरू बांगलादेशी घुसखोर आढळला तर थेट घरमालकांवरच गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जव्हार पोलीस उपविभागीय अधिकारी तथा डीवायएसपी एस एस महेर यांनी दिला आहे.
पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली असल्याची माहिती यावेळी महेर यांच्याकडून देण्यात आली आहे. बांगलादेशी शहर, गावखेड्यात आढळण्याची शक्यता असल्याने ग्रामीण परिसरातील चाळमालक व घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी. एखादा भाडेकरू बांगलादेशी असल्याचे लक्षात येताच तत्काळ त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. जर घरामध्ये बांगलादेशी नागरिक आढळला तर त्या घरमालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, ही कारवाई टाळण्यासाठी नागरीकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा अशी विनंती यावेळी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
बांगलादेशी नागरिक हॉटेल, बार, बांधकाम साइट्स,लेबर कॉन्ट्रॅक्टर, सलुन, शिंपीकाम किंवा इतर कोणत्याही व्यावसायात काम करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही यावेळी महेर यांनी सांगितले. भाड्याच्या अमिषा पोटी घरमालक देखील कोणतीही विचारपूस न करता नागरिकांना घर भाड्याने देत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी कंबर कसली असून गाव परिसरामधील घरमालकांना व चाळीमालकांना यावेळी विशेष आवाहन करण्यात येत आहे. घरमालकांनी वेळीच सावध होऊन भाडेकरूंची माहिती पोलीस प्रशासनाला कळवावी. एवढेच नव्हे तर एखादा घरमालक किंवा चाळीमालक बांगलादेशी नागरिकांशी संबंधित माहिती लपवत असेल तर कोणत्याही नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन महेर यांनी जव्हार उपविभागातील नागरिकांना केलेले आहे.