कुंभमेळा प्राधिकरणाकडून 104 कोटींच्या कामांना सुरूवात pudhari photo
पालघर

Kumbh Mela project : कुंभमेळा प्राधिकरणाकडून 104 कोटींच्या कामांना सुरूवात

मोखाडा हद्दीतील काम वादात,वर्क ऑर्डर नसताना काम सुरू,रस्ता रुंदीबाबत माहिती नाही

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अनेक विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राज्य शासनासमोर असल्याने आता नाशिकला जोडणाऱ्या इतर रस्त्यांच्या कामांना देखील गती मिळाली आहे. यासाठी तब्बल 574 कोटींची विविध मार्गाने आणि विविध जिल्ह्यातून नाशिक या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा यामध्ये समावेश आहे यासाठी मोखाडा हद्दीतून पोशेरा,हिरवे, पिंपळपाडा,आडगाव, देवळा ते आंबोली वाहनतळ जाणारा रस्ता सुधारणा करणे या 104 कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे.

यामध्ये मोखाडा तालुका हद्दीतील पोशेरा गावाजवळून वखारीचा पाडा ते हिरवे पिंपळपाडा मार्गे वेळुंजे (नाशिक )जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस असल्याचे सांगून काम मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत आहे.मात्र वर्क ऑर्डर होण्याच्या अगोदरच कामाला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे आज अनेक विकास कामांना निधी उपलब्ध नसताना ठेकेदार बेजार आहेत.अशा परिस्थितीत वर्क ऑर्डर हातात नसताना काम सुरू करण्याच्या या प्रक्रियेमुळे कामवाटप प्रक्रियेवरच आता संशय व्यक्त होत आहे.

वर्क ऑर्डर नसताना काम सुरू केल्याच्या मुद्द्यावरून माजी आमदार सुनील भुसारा यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला यानंतर हे काम थांबविण्यात आले. मात्र हा मुद्दा असतानाच हे काम ज्या मार्गाने सुरू करण्यात आले आहे त्या मार्गावरील अनेक ठिकाणी अगदी रस्त्या नजीक नागरिकांनी घरे बांधलेले आहेत. यातील पक्क्या घरांचे प्रमाण देखील अधिक आहे.

अशावेळी अशी कामे सुरू करण्याच्या अगोदर रस्त्या शेजारील जागा मालक असतील किंवा घर मालक असतील यांना पूर्वकल्पना देणे ह्या रस्त्याचे प्रयोजन रस्त्यांची रुंदी याबाबत जनजागृती करणे आवश्यक आङे. मात्र थेट हे काम सुरू झाल्याने या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या रस्त्यामुळे आमची घरे तुटतील की काय या भीतीपोटी येथील लोकांनी देखील हे काम बंद पाडले होते. मात्र या संदर्भात काम करणारे ठेकेदार किंवा देखरेख करणारे अधिकारी यांच्याकडे ठोस उत्तरे नसून आम्ही लोकांना कळवणारच होतो.असे ढोबळ उत्तर दिल्याने या कामाबाबत संभ्रम अधिक वाढला आहे.

यामुळे हा रस्ता करताना कोणत्या लोकांच्या किती जागा जाणार,घर तुटणार की राहणार याबाबत स्पष्टता आल्याशिवाय हे काम सुरू करू नये अशी मागणी या भागातील लोकांची आहे मात्र या मागणीला केराची टोपली दाखवून कसलाही कार्यारंभ आदेश नसताना काम सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याशिवाय काम करणारी यंत्रणा नाशिक जिल्ह्यातील किंबहुना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्याकडे असल्याने याबाबत तक्रार नेमकी कोणाकडे करायची याचीही माहिती येथील नागरिकांना नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

मुळात कोणताही प्रकल्प आणि रस्ते होताना यामध्ये नुकसान होणाऱ्या रहिवाशांची परवानगी किंवा याबाबतची माहिती त्यांना देणे गरजेचे असते. जेणेकरून हे विकास काम करताना कोणाचीही नुकसान होता कामा नये. मात्र कुंभमेळ्याचे नाव घेऊन काम उरकण्याच्या नादात हे काम सुरू केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मोखाडा तहसीलदार यांच्याकडे माजी आमदार सुनील भुसारा, नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली.

यावेळी वर्क ऑडर नसताना काम कसे सुरू झाले याबाबत विचारणा केली असता प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने वर्क ऑर्डर होणारच आहे आणि ती बॅक डेट ने होईल असे उत्तर दिल्याने अधिकच संभ्रम वाढला आहे. यामुळे मर्जीतील ठेकेदारांना काम मिळण्यासाठी काही वेगळी यंत्रणा काम करते आहे की काय असाही सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जर वर्क ऑर्डरच संबंधित एजन्सीला नसेल तर तब्बल 104 कोटींचे काम सुरू करण्याचा आत्मविश्वास या ठेकेदाराला कुठून आला ? याचा देखील शोध होणे आवश्यक आहे.

“ काम सुरू करण्याअगोदर लोकांशी चर्चा होणे आवश्यक होते.निश्चितच वेळेत काम पूर्ण करावयाचे आहेच मात्र ज्यांची घरे जागा आहेत त्यांना याबाबत कल्पना देण्याच्या सूचना केलेल्या आहेत.या विषया संदर्भात संबंधित ठेकेदाराला ताकीद दिलेली आहे.
राहुल पाटील, कार्यकारी अभियंता,कुंभमेळा प्राधिकरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT