Kohoj fort Forest fire Pudhari
पालघर

Kohoj fort Forest fire: कोहोज किल्ला वणव्यांच्या विळख्यात; शेकडो हेक्टर जंगल जळाले

वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप; जैवविविधता आणि वन्यजीवांना मोठा धोका

पुढारी वृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्यातील विविध जंगलात आगीच्या घटना घडत असतानाना ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला कोहोज किल्ला दोन दिवसांपासून आगीच्या विळख्यात सापडलेला आहे.

शेकडो हेक्टरवरील वनसंपदा, वन्यजीवांचे अधिवास आणि जैवविविधता नष्ट झाल्याचे बोलले जात असून वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक सांगतात.वाडा तालुक्यातील विविध भागात लागणाऱ्या वनव्यांमुळे जंगलं संकटात सापडली असुन उलरोठे गावातील जंगलाची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलात शनिवारी आग लागली असून आता ही आग किल्ल्याला वेढा घालीत आहे. रविवारी देखील हा किल्ला धुमसत असल्याचे पाहायला मिळत असून आग लागण्याची घटना नित्याची झाली आहे असे स्थानिक सांगतात.

ससे, रानडुक्कर तसेच अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात अनेकदा आग लावून दिली जात असून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश येत नसल्याचे दुर्दैव आहे. किल्ल्याचा बहुतांश भाग वनविकास महामंडळच्या ताब्यात असून आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा त्यात सुट्टीचा दिवस असल्याने कर्मचारी नेमके करतात तरी काय असा सवाल विचारला जात आहे. कोहोज किल्लाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून या जंगलात औषधी वनस्पतींचा भंडार आहे. आगीच्या घटनांनी जंगलात हाहाकार माजत असून वन विभागाने या घटना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली जात आहे.

जंगलात आग लागल्याने वन संपदा संपुष्टात येते हे सत्य असून कोहोज किल्ल्यावर वणवे ही दरवर्षीची बाब आहे. ऐतिहासिक महत्व असणाऱ्या वास्तूची आपण जर जोपासना करू शकत नसलो तर हे मोठे दुर्दैव आहे. वन विभागाने या घटनांवर ताबा मिळविणे गरजेचे असून तसा प्रयत्न होताना कुठेही पाहायला मिळत नाही. किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासन नेहमी तोकडे पडत असून याबाबत ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. - स्वप्निल ठाकरे , पर्यावरण प्रेमी, स्थानिक नागरिक .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT