खोडाळा (पालघर) : पालघर वाडा देवगाव राज्यमार्ग क्र. 34 वर खोडाळा ते वाघ्याचीवाडी दरम्यान रस्त्याला मोठे भगदाड पडले असून रस्ता आतून अर्धा अधिक पोकळ झालेला आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणार्या नवागत वाहन चालकांना धोका संभवत आहे. तसेच याच राज्य मार्गावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याच्या देखभाल दुरुस्ती साठी कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने या मार्गावरुन धावणार्या वाहनांना सध्या तरी धोकादायक परिस्थितीतूनच वाट काढावी लागत आहे.
मोखाडा तालुक्यात पालघर वाडा देवगाव राज्यमार्ग क्र 34 आणि मोखाडा विहीगाव कसारा राज्य मार्ग क्र 37 हे महत्त्वाचे आणि अवजड वाहतुकीचे राज्यमार्ग म्हणून प्रचलित आहेत.तथापी या दोन्ही राज्य मार्गावर ठिकठिकाणी थोड्या बहुत फरकाने वाताहत झालेली असून खड्डे पडलेले आहेत.
खोडाळा ते वाघ्याची वाडी दरम्यान अर्धा अधिक रस्ता खचलेला असून रस्त्यावर खचलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूस दोन छोटे दगड ठेवून केवळ दोन दगडांच्या भरवशावर वाहतूकीच्या सुरक्षेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली असून त्यानंतर बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरवस्थेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.वास्तविकत: या ठिकाणी ठळकपणे दिसतील असे सफेद पट्टे आणि धोकादर्शक फलक किंवा रिबन लावणे क्रमप्राप्त होते.परंतू सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी त्याबाबत कोणतीही खबरदारीची उपाययोजना केलेली नाही.
मोखाडा तालुक्यात सर्वत्र खाजगी कंपन्यांनी भ्रमणध्वनी च्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदून केबल टाकलेल्या आहेत.त्यामूळे राज्य मार्गांची अक्षरशः वाट लागलेली आहे.राज्यमार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे.खोडाळा ते वाघ्याचीवाडी दरम्यानचा रस्ताही केबल मुळेच खचलेला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग देखभाल दुरुस्ती किंवा तात्पुरती डागडुजीही करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मोखाडा तालुक्यात खोडाळा ही महत्त्वाची बाजारपेठ आहे.या ठिकाणी प्रवाशी आणि वाहनांचा मोठा राबता असतो.बाजारपेठेच्या चतूर्सिमेवर आणि खुद्द बाजारपेठेतही खड्ड्यांचा अक्षरशः सुकाळ झालेला आहे.मोखाडा विहीगांव राज्यमार्गावर खोडाळा नजीक बाजारपेठेच्या दुतर्फा आणि रस्त्याच्या मध्यावर जलजीवन मिशनच्या जल वाहिनीमूळे मधोमध खोदकाम केल्याने हमरस्त्याची वाट लागलेली आहे.