खानिवडे : वसई पूर्वेतील तानसा खाडी वरील खानिवडे बंधाऱ्याला गळती सुरू झाली आहे. यामुळे या बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षारयुक्त झाली आहे. असे पाणी उन्हाळी पिकांना नुकसानकारक ठरण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
वसई तालुक्यातील तानसा खाडीवर 1984 साली बांधण्यात आलेला कोल्हापूर टाईप बंधारा हा आता जीर्ण झाला असून त्याला मागील काही वर्षांपासून गळती सुरु झाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ही तानसा खाडी आहे. या खाडीला दिवसातून दोनदा भरती आणि ओहोटी सुरू असते. ह्या बंधाऱ्याला गळती सुरू झाल्यामुळे भरतीचे पाणी साठवणुकीत मिसळून क्षारयुक्त होत असल्याने कोणताच फायदा शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी घेता येत नाही.
यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून मागील काही वर्षे दरसाल लाखो रुपये खर्चून दुरुस्ती केली जात आहे. मात्र त्याचा विशेष फायदा झाला नाही. चालू वर्षी तर पावसाळ्यानंतर बंदोस्ती झाल्यावर गळक्या बंधाऱ्यामुळे भरतीचे खारे पाणी मिसळून पूर्ण साठवणूक क्षारयुक्त झाली असल्याने शेतकऱ्यांनी वाडी पिके घेतली नाहीत.
मागील चार वर्षांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने बंधाऱ्याच्या प्रत्येक पिलरला दोन्ही बाजूने बोअर खणून त्यामध्ये प्रेशरने सिमेंट पाणी भरण्याचे काम हाती घेतले होते. यामुळे पिलरच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट फिट बसून बऱ्याच प्रमाणात गळती रोखता येते असे सांगितले होते. त्याप्रमाणे बऱ्याच प्रमाणात गळती आटोक्यात आली होती. मात्र असे असले तरी बांधाऱ्यातील खालच्या पाया च्या योग्य दुरुस्ती शिवाय गळती कायमची थांबणार नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे दरसाल दुरुस्तीवर लाखोंचा खर्च करण्यापेक्षा एकदाच काय तो योग्य उपाय करावा किंवा नवा बांधारा बांधावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.