कासा : पालघर जिल्ह्यात बुधवार (दि.२२) पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील कासा परिसराला गुरुवारी (दि. २३) महापुराचा वेढा पडला. गेल्या अनेक वर्षांतील विक्रमी पावसामुळे सूर्या नदीसह उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीकाठच्या गावांसह सखल भागातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, तर अनेक अंतर्गत रस्ते, पूल व मोऱ्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सूर्या नदीवरील धामणी व कवडास धरणे ओव्हरफ्लो झाली. धरणातून होणारा विसर्ग आणि सतत पडणारा पाऊस यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला. तसेच नदीच्या उपनद्यांनाही पूर आल्याने वेती, कासा, घोळ, धामटणे, भराड, आंबिवली, उर्से, म्हसाड आदी नदीकाठच्या गावांमध्ये तसेच ओहोळालगतच्या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले.
सखल भागातील घरांमध्ये कंबरभर पाणी शिरल्याने घरातील धान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे, कपडे तसेच संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आला होता. काही गावांचा संपर्क तासन्तास तुटल्याने नागरिकांना अत्यावश्यक वस्तू मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागला.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्ते, पूल व मोऱ्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. प्रशासनाने धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स उभारून नागरिकांना पूरग्रस्त भागात जाण्यास मज्जाव केला. महसूल, पोलीस, ग्रामपंचायत तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्कता बाळगली.
दरम्यान, शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पूरस्थितीत आंशिक सुधारणा झाली असली तरी नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात भातशेती पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी नव्याने लावलेली भाताची रोपे वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
पूरग्रस्त नागरिकांच्या घरांचे तसेच शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे. हवामान विभागाने अद्यापही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, पूल व पूरग्रस्त रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.